“नॅशनल पेन्शन सिस्टीम’ची (एनपीएस) चर्चा जोरात सुरू आहे.

पण बँकेमध्ये विचारणा केल्यावर फारच कमी माहिती मिळते ज्यांना माहिती आहे तिथपर्यंत सामान्य पोहोचत नाहीत व माणूस निराश होतो हे पाहून यासंबंधी अधिक व योग्य माहिती देण्यासाठी हा लेख प्रसिद्ध होत आहे.

या योजनेत मिळणाऱ्या अतिरिक्त करसवलतीमुळे त्याविषयीची उत्सुकता बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या संदर्भात काही बदलही करण्यात आले आहेत. ‘एनपीएस’ ही एक ऐच्छिक योजना असून, लोकांना निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अंतर्गत, तुमची बचत ही ‘पीएफआरडीए’ने मान्यता दिलेल्या गुंतवणुकीच्या मार्गदर्शनानुसार व्यावसायिक फंड व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली पेन्शन योजनेत गुंतविली जाते. तुमचे पैसे सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर आणि शेअर्स यांमध्ये विभागून गुंतविले जातात.

‘एनपीएस’चे फायदे

1)       लवचिकता: “एनपीएस’मधील गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय दिले जातात. तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीसाठी पेन्शन फंड मॅनेजरचे पर्यायसुद्धा दिले जातात आणि तुम्ही गुंतवणुकीच्या एका पर्यायावरून दुसऱ्या पर्यायात बदल करून घेऊ शकता.
2) पोर्टेबलिटी: नोकरी किंवा रहिवासाचे ठिकाण अशा बाबतींचा विचार केला, तर “एनपीएस’ ही योजना सर्वांत चांगली पोर्टेबिलिटी देते.
3) पारदर्शकता: एनपीएस ही “पीएफआरडीए’च्या नियमांतर्गत येते. यांत गुंतवणुकीचे पारदर्शक नियम, नियमित देखरेख असते आणि “एनपीएस’च्या ट्रस्टद्वारे फंड मॅनेजरच्या कार्यकुशलतेचा आढावा घेतला जातो.
4) कमी खर्च आणि चक्रवाढीचा लाभ: भारतातील अन्य पेन्शन योजनेच्या तुलनेत “एनपीएस’च्या योजनेत मिळतो.

‘एनपीएस’मधील गुंतवणुकीचे फायदे

1) कलम 80 सीमधील वजावट : कलम 80 सीच्या अंतर्गत 1,50,000 रुपयांपर्यंतची तुमची गुंतवणूक करवजावटीस पात्र असते. यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), आयुर्विम्याचा हप्ता, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी), मुलांची ट्युशन फी आणि गृहकर्ज मुद्दल आणि एनपीएस असे विविध पर्याय येतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही रु. 50,000 “पीपीएफ’मध्ये, रु. 25,000 आयुर्विम्यात, गृहकर्जाच्या मुद्दलापोटी रु. 25,000; तर “एनपीएस’मध्ये 50,000 गुंतवू शकता आणि 80 सीच्या अंतर्गत रु. 1,50,000चा फायदा घेऊ शकता. थोडक्‍यात, तुमचे रु. 1,50,000 वजावटीला पात्र आहेत; पण “एनपीएस’ गुंतवणुकीसाठी एक कमाल मर्यादा आहे. तुम्ही पगारदार असाल, तर तुमच्या मूळ वेतनाच्या (महागाई भत्त्यासह) 10 टक्के किंवा तुम्ही पगारदार व्यक्ती नसाल, तर तुमच्या एकूण ढोबळ उत्पन्नाच्या 10 टक्के अशी ही मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. याचा अर्थ तुमच्या पगाराच्या किंवा एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 10 टक्केच रक्कम “एनपीएस’मध्ये गुंतविता येते. उदाहरणार्थ, तुमचा पगार रु. 10 लाख आहे असे मानले, तर तुम्ही “एनपीएस’मध्ये जास्तीत जास्त रु. एक लाख गुंतवू शकता. त्यामुळे 80 सीअंतर्गत या योजनेत तुम्ही एक लाखाच्या गुंतवणुकीवरच फायदा घेऊ शकता. “एनपीएस’मध्ये दोन प्रकारची खाती असतात. टियर-1 खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रु. 6 हजार गुंतवावे लागतात, तर टियार-2 खात्यासाठी ही किमान मर्यादा रु. 2 हजारांची आहे.

2) कलम 80 सीसीडी (1बी)अंतर्गत अतिरक्त लाभ : कलम 80 सीसीडी (1बी)अंतर्गत 2015-16 या आर्थिक वर्षात रु. 50,000 च्या अतिरिक्त करवजावटीचा लाभ मिळू शकतो. ही रक्कम कलम 80 सीच्या मर्यादेव्यतिरिक्‍त आहे, म्हणजेच तुम्ही 80 सीअंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर (“एनपीएस’सह) रु. 1,50,000 पर्यंत वजावट मिळू शकते आणि 2015-16 या आर्थिक वर्षात “एनपीएस’मधील गुंतवणुकीवर आणखी रु. 50,000ची अतिरिक्त वजावट मिळेल.

3) 80 सीसीडी (2)अंतर्गत कंपनीकडून योगदान : जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमची कंपनी तुमच्या वतीने तुमच्या “एनपीएस’ खात्यात पैसे भरत असेल तर तेसुद्धा 80 सीसीडी (2)अंतर्गत करवजावटीस पात्र आहे. वर उल्लेख केलेल्या 80 सी आणि 80 सीसीडी (1बी)अंतर्गत असलेल्या वजावटीव्यतिरिक्त ही अतिरिक्त वजावट आहे; तसेच याला एक कमाल मर्यादासुद्धा आहे. तुमची कंपनी तुमच्या मूळ वेतनाच्या 10 टक्केच (महागाई भत्त्यासह) रक्कम “एनपीएस’च्या खात्यात भरू शकते.

“एनपीएस’मधून पैसे कधी मिळतात?
“एनपीएस’ ही दीर्घकाळाची योजना असून, तुम्हाला विशिष्ट अटींनुसार पैसे मिळतात.
1) वय वर्षे 60 पूर्ण झाल्यावर : मुदतपूर्तीच्यावेळी तुमच्या गुंतवणुकीच्या (पेन्शन निधी) किमान 40 टक्के रक्कम जीवनभराच्या पेन्शनखरेदीसाठी गुंतवावी लागते आणि बाकीची रक्कम तुम्ही एकरकमी काढू शकता.
2) कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास : खातेदाराच्या मृत्यूसारख्या दुर्दैवी घटनेत, वारसाला (नॉमिनी) “एनपीएस’मधील 100 टक्के रक्कम एकरकमी मिळण्याची सोय असते किंवा नॉमिनीला “एनपीएस’ सुरू ठेवायची असेल तर “केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून त्याला “एनपीएस’चे सदस्यत्व घेता येते.

केलेले बदल  

वर उल्लेख केल्याप्रमाणे, जेव्हा तुमचे वय 60 वर्षे असते, तेव्हा तुम्ही तुमच्या एकूण पेन्शनच्या 60 टक्के रक्कम एकरकमी काढू शकता आणि त्या सर्व रकमेवर करआकारणी लागू होते; पण नव्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एकूण रकमेच्या 40 टक्के रक्कम ही करमुक्त असेल, असे जाहीर केले आहे. याचा अर्थ तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 60 टक्के रकमेतील 40 टक्के रक्कम ही करमुक्त असून, उरलेल्या 20 टक्के रकमेवरच कर भरावा लागेल.

उदाहरणार्थ, जर तुमच्या “एनपीएस’ खात्यात मुदतपूर्तीच्या वेळी म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षी रु. 10 लाख एवढी रक्कम असेल, तर तुम्ही फक्त 60 टक्के रक्कम म्हणजे रु. 6 लाख काढू शकता आणि उर्वरित रु. 4 लाख तुम्हाला जीवनभराच्या पेन्शनखरेदीसाठी वापरावे लागतील आणि त्यातून दरमहा पेन्शन सुरू होईल. आता तुम्ही काढलेल्या एकूण रु. 6 लाखांमधील रु. 4 लाखांवर म्हणजेच एकूण रकमेच्या 40 टक्‍क्‍यांवर कोणताही कर भरावा लागत नाही आणि शिल्लक रक्कम रु. 2 लाखांवर तुम्हाला तुमच्या “टॅक्‍स स्लॅब’प्रमाणे कर भरावा लागेल. यामुळे “एनपीएस’ ही ईपीएफ आणि पीपीएफ यासारख्या योजनांच्या जवळ पोचेल, ज्यात काढलेली सर्व रक्कम ही करमुक्त असते.

करबचतीबरोबरच निवृत्तीनंतरचीही तरतूद करणाऱ्या “एनपीएस’विषयी अनेक नागरिक अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते. परंतु, या योजनेबाबत आपणच सजग राहून त्यात सहभागी झाले पाहिजे व त्याचा लाभ करून घेतला पाहिजे हे महत्वाचे.

 

अभिप्राय द्या!