आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी व्यक्तिगत करदात्यांना दोन महिन्यांचा वाढीव कालावधी यंदाही मिळणार आहे. गुरुवारी सरकारने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कंपन्यांना विवरण पत्र भरण्याची मुदतही ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एका महिन्याने वाढविली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा दाहक परिणाम पाहता, करदात्यांना दिलासा म्हणून हे मुदतवाढीचे पाऊल टाकले असल्याचे कर मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पगारदार करदात्यांना विवरण पत्र भरण्यासाठी आवश्यक आणि नियोक्त्यांकडून दिले जाणाऱ्या ‘फॉर्म १६’ वितरित करण्याची अंतिम मुदतही आता १५ जुलै २०२१ अशी करण्यात आली आहे.

प्राप्तिकर कायद्याप्रमाणे, ज्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करणे आवश्यक नसते आणि जे ‘आयटीआर-१’ किंवा ‘आयटीआर-४’ या नमुना अर्जांचा वापर करून विवरण पत्र भरतात त्यांना व्यक्तिगत करदाते असे म्हटले जाते, त्यांना वाढीव दोन महिन्यांच्या मुदतीचा लाभ मिळेल.

अभिप्राय द्या!