आपले खर्च कमीत-कमी ठेवून जास्तीत-जास्त बचत करणे सध्याच्या काळात  क्रमप्राप्तच ठरते. अर्थात बचत वाढवत नेणे आणि ती नित्याने होत राहिल याची खातरजमा करणे वाटते तेवढे सोपे नाही. बचत वाढवण्यात आणि त्यायोगे मन:शांतीची निश्चिती करण्यास मदत करू शकतील असे म्हणूनच हे पाच सोपे मार्ग पुढे दिले आहेत.

१. खर्चावर नियंत्रण : पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या खर्चावर बारीक लक्ष ठेवणे ही होय. आपण अजाणतेपणी अधिक खर्च करत असू अशा बाबी शोधून काढणे कोणालाही शक्य आहे. महिनाभरात केलेल्या सर्व खरेदीच्या पावत्या जपून ठेवण्यापासून सुरुवात करा आणि पावत्यांची वर्गवारी करा. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टींवर अधिक खर्च केला आहे हे तुम्हाला ओळखता येईल. यातील अनावश्यक वाटणारे खर्च तुम्ही टाळू शकता.

२. अंदाजपत्रक तयार करा : खर्च-उत्पन्नाचे नियोजन करताना टाळता येण्याजोगे व अपरिहार्य खर्च ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मासिक खर्च उत्पन्नाच्या तुलनेत किती आहेत हे रीतसर अंदाजपत्रकाद्वारे अधोरेखित झाले पाहिजे. ज्यायोगे किराणा सामान, औषधे, शिक्षण, प्रवास आदी न टाळता येणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त अन्य योग्य खर्च कोणते ते निश्चित करण्यात मदत होईल.

३. आपत्कालीन निधीची तरतूद : अनपेक्षित काळासाठी सज्ज राहणे नेहमीच उत्तम असते. आपत्कालीन निधी हा निकोप व्यक्तिगत वित्तीय आराखडय़ाचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो आणि खऱ्या अर्थाने आपत्कालीन परिस्थिती आल्याखेरीज त्याला हात लावला जाऊ नये. आपत्कालीन निधी सुरक्षित राखायचा कुठे? तर यासाठी एक अत्यंत सुलभ मार्ग म्हणजे एक नवीन बँकखाते उघडायचे आणि एक निश्चित रक्कम दर महिन्याच्या सुरुवातीला त्या खात्यात भरायची.

४. मोठय़ा खर्चाचे नियोजन : एकदा आपत्कालीन निधीची रक्कम बाजूला काढली की त्याबरोबरच मोठय़ा खर्चासाठीही आधीपासून बचत सुरू करा. ही बचत दर आठवडय़ाला किंवा दर महिन्याला छोटय़ा रकमेपासून सुरू करता येईल. सध्या करोनाच्या अनिश्चित काळात, महागडय़ा खरेदी योजना पुढे ढकलणे उत्तम. निर्णय झालाच असेल तर अशा मोठय़ा खरेदींसाठी खर्च होणारा पैसा त्याचा पुरेपूर मोबदला देणारा आहे की नाही याचे मूल्यमापन करा अन्यथा स्वस्तातील पर्यायांचा विचार करा.

५. कर्जांची परतफेड वेळेत करा : पहिली महत्त्वाची बाब म्हणजे बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून स्पर्धात्मक दरात कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करा. कर्जाच्या उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्तम पर्यायाची निवड करणे आणि तुमचे कर्ज पूर्ण फेडले जाईपर्यंत नियमित हप्ते भरत राहणे निर्णायक महत्वाचे आहे.

आयुष्य खूपच अनिश्चित असते आणि स्वत:चे व कुटुंबाचे आर्थिक अडचणींपासून संरक्षण करण्यासाठी term plan  ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे. वर सांगितलेल्या नियोजनांत तुमच्याकडे कुटुंबाचा आरोग्यविमा आहे, हे गृहित धरले आहे. नसेल तर सुरुवात त्यापासूनच होणे हेच सर्वोत्तम !

अभिप्राय द्या!