जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर किंवा बँकांशी संबंधित अन्य बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय. सलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्था अंदाजे किती टक्क्यांनी वाढेल यातही एका टक्क्याची घट केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्कांचा विकासदर साधेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केलाय. आधी हा दर १०.५ टक्के असेल असं सांगण्यात आलेलं, मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आर्थिक विकासाला बसल्याने या विकासदरामध्ये एका टक्क्यांनी घट करण्यात आलीय.

अभिप्राय द्या!