hudco / RBL बँक / Dmart यांचे IPO जेव्हा खरेदीसाठी खुले झाले तेव्हा अनेकांनी ते घेण्यासाठी विचारणा केली . सेबीच्या नव्या नियमानुसार ASBA असलेले खाते आवश्यक असे सांगितल्यवर अनेकांना त्याचा अर्थबोध होत नव्हता. म्हणून ASBA म्हणजे काय ? त्याचा फायदा काय ? हे थोडक्यात सांगत आहे .

अॅस्बा’ म्हणजे काय?
सिक्‍युरिटीज एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी)  एक जानेवारी 2016 पासून इक्विटीच्या “इनिशिअल पब्लिक ऑफर’साठी (आयपीओ) अर्ज करताना सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी (रिटेलसुद्धा) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्‍ड अमाउंट’चा अर्थात ‘अॅस्बा’चा वापर अनिवार्य (कम्पल्सरी) करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याचा वापरही सुरु झाला आहे .
‘अॅस्बा’ म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे- अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्‍ड अमाउंट’! ‘आयपीओ’साठी अर्ज करण्यासाठी बहुतांश रिटेल गुंतवणूकदार जानेवारी १६ पर्यंत धनादेश (चेक) देत; पण ‘अॅस्बा’द्वारे अर्ज करताना तुम्हाला कोणताही धनादेश द्यावा लागत नाही. त्याऐवजी अर्जामध्ये असलेल्या ‘अॅस्बा’च्या रकान्यात तुमच्या बॅंक खात्याचा तपशील भरावा लागेल. ज्यायोगे तुम्ही जितक्‍या शेअर्ससाठी अर्ज केला आहे, तेवढी रक्कम तुमच्या बॅंक खात्यामध्ये ‘ब्लॉक’ केली जाते. ती रक्कम तुमच्या खात्यामध्येच असते; परंतु ती तुम्हाला काढता अथवा वापरता येत नाही. तुम्हाला शेअर्सची ऍलॉटमेंट झाल्यानंतर तेवढे पैसे तुमच्या खात्यामधून हस्तांतरित (ट्रान्स्फर) केले जातात. दरम्यानच्या काळात तुम्ही खात्यामध्ये उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरू शकता. यामध्ये तुमचे संपूर्ण बॅंक खाते ‘ब्लॉक’ होत नाही. समजा, तुम्हाला अॅलॉटमेंट मिळालीच नाही, तर तुमचे पैसे ट्रान्स्फर न होता ते मोकळे केले जातात.
‘अॅस्बा’चे फायदे पुढीलप्रमाणे :
1) अॅप्लिकेशन केल्यापासून अॅलॉटमेंट होईपर्यंत जो काळ जातो, त्या काळामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यातच राहात असल्यामुळे, त्यांना त्याच्यावरचे व्याज मिळत राहाते. 2) गुंतवणूकदारांना परताव्यासाठी (रिफंड) थांबावे लागत नाही, कारण अॅलॉटमेंट जेवढी होते, तेवढेच पैसे बॅंक खात्यामधून वजा होतात. 3) ‘अॅस्बा’मुळे शेअर्स लिस्टिंग होण्यासाठी लागणारा कालावधी कमीहोतो .
तांत्रिक बाबी
तुमचे ‘अॅस्बा’चा तपशील असलेले ‘आयपीओ’साठीचे अर्ज तुम्ही तुमच्या शेअर ब्रोकरकडे देऊ शकता. आज सर्व बॅंका कोअर प्रणालीने जोडल्या असल्यामुळे ठराविक बॅंकेत अर्ज करावा लागणार नाही. ‘अॅस्बा’चा तपशील असलेले अर्ज तुम्ही इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाद्वारेसुद्धा सादर करू शकता. ‘अॅस्बा’साठी तुमचे डी-मॅट खाते तुमच्या बॅंकेतच असण्याची आवश्‍यकता नाही, ते कोठेही असले तरी चालते. ‘अॅस्बा’चा तपशील अतिशय काळजीपूर्वक भरणे आवश्‍यक आहे  अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

अभिप्राय द्या!