भारतात ‘ईएसजी’ हा फंड प्रकार नव्याने उदयाला येत आहे. ‘ईएसजी’ फंडांतील कंपन्यांचा सुदृढ ताळेबंद त्या कंपन्यांची व्यावसायिक नैतिकता लक्षात घेता, गुंतवणुकीसाठी अतिरिक्त विकल्प प्रस्तुत करतो. जागतिक पातळीवरील वाढ, स्वीकारार्हता आणि जागरूकता पाहता, भविष्यात आपल्याकडेही ईएसजी फंडांच्या जोमदार वाढीस नि:संशय चालना मिळेल.

म्युच्युअल फंड उद्योगात अलीकडील काही वर्षांत फंडाचा एक नवीन प्रकार उदयाला आला आहे. जगभरातील गुंतवणूकदार एन्व्हायर्नमेंट, सोशल, गव्हर्नन्स (ईएसजी) या निकषांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांचा सक्रिय शोध घेत असतात.  भारतात या संकल्पनेवर संधी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे या संकल्पनेवर आधारित गुंतवणूक करणारे १० फंड असून यापैकी सात फंडांनी विद्यमान २०२१ सालातच सुरुवात झाली आहे.

जागतिक आणि स्थानिक पातळीवर ईएसजी निर्देशांकांची कामगिरी दीर्घ कालावधीसाठी बाजाराच्या विस्तृत निर्देशांकापेक्षा अव्वल झाली आहे. आपण जागतिक ईएसजी गुंतवणुकीचा विचार केल्यास १ जानेवारी २०१० मध्ये ‘एमएससीआय वर्ल्ड ईएसजी सेक्टर लीडर्स इंडेक्स’मध्ये १०० डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराची २१ मे २०२१ रोजी गुंतवणूक ४,२६७ डॉलपर्यंत वाढली आहे. हीच गुंतवणूक व्यापक निर्देशांकानुसार केली असती तर २,३४३ डॉलर इतकी वाढली असती. याचप्रमाणे भारतीय ईएसजी निर्देशांकामध्ये गुंतवणूक केल्यास चांगले उत्पन्न मिळाले असते. ‘निफ्टी १०० ईएसजी सेक्टर लीडर्स इंडेक्स’च्या स्थापनेसमयी (१ जानेवारी २०१४) एक लाख रुपयांची गुंतवणूक २१ मे २०२१ रोजी वार्षिक १३.७ टक्के दराने वाढून २.५९ लाख रुपये झाली असती. हीच रक्कम बाजाराच्या व्यापक निर्देशांकानुसार १३ टक्के दराने वाढून २.४७ लाख रुपये झाली असती.

‘ईएसजी’ संकल्पना केवळ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करीत नाही तर गुंतवणुकीतील अस्थिरतासुद्धा कमी करते.

अभिप्राय द्या!