रियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य?
माझ्या ओळखीत एका शिक्षकी पेशाच्या माणसाने त्यांच्या उमेदीच्या काळात एक फ्लॅट घेतला. त्यासाठी घेतलेले कर्जाचे हफ्ते पूर्णतः परतफेड होण्यापूर्वी त्याने त्याच्या घराशेजारी एका नव्याने सुरू होत असलेल्या प्रोजेक्टमध्ये आपल्या पत्नीच्या नावाने आणखी एक फ्लॅट बुक केला. या दोन्ही फ्लॅटचे हफ्ते फेडून झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या मनात बंगल्यात राहण्याचा विचार घोळू लागला. आणि त्याचे पर्यवसन शहरापासून लांब असलेल्या , पण नव्याने डेव्हलप होत असलेल्या ठिकाणी प्लॉट घेऊन बंगला बांधण्यात झाले . यथावकाश निवृत्त झाल्यावर त्यांच्या मुलाने मोठ्या शहरात राहण्याचा निणर्य घेतल्यामुळे गेले चार वर्षे हे महाशय आपले फ्लॅटआणि बंगला विकण्यासाठी जाहिराती देऊन अक्षरशः मेटकुटीला आले आहेत !
सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीमुळे त्यांच्या अपेक्षेनुसार खरेदीदार मिळत नसल्याने 2 फ्लॅट व 1 बंगला यांचे विद्युतदेयक , मेंटेनन्स कॉस्ट आणि किरकोळ देखभाल यासाठी दरमहा आपल्या पेन्शनमधून किमान ५००० रु. खर्च करीत असून , या सर्वापायी मानसिक त्रास सहन करीत आहेत ! त्यात सध्या मुलाकडे राहणे भाग पडत असल्याने अपुरी जागा आणि इतर अनुषंगिक खर्च पाहता ही सर्व *प्रॉपर्टि येईल त्या किमंतीला विकून टाकावी * असे विचार त्यांच्या मनात येतात. आणि हे सर्व पाहतासेकंड होम किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करावी का ? हा प्रश्न माझ्या मनात येतो.
मिळेल त्या किमंतीला ही सर्व प्रॉपर्टि विकावयाची झाल्यास त्यासाठी घेतलेले कर्ज , त्यावर फेडलेले व्याज व केलेली मेहनत, देखभाल दुरूस्तीसाठी आलेला खर्च आणि या सर्व *रक्कमेचे अ‍ॅप्रीसीएशन * पाहता हा सर्व व्यवहार आतबट्याचा होतो.
आणि या दृष्टीने *रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे * आपल्या सर्वांच्या निदर्शनात आणणे अत्यावशक वाटत आहे.
रियल इस्टेट मधील गुतंवणूक कायमस्वरूपी तोट्याची असेल असे नाही पण फायदा आणि तोटा पाहता त्यामधून तोटेच जास्त होणे अधोरेखित होत आहे !
*अशा प्रक्रियेच्या गुंतवणूकित होणारे फायदे : *
1. सुलभ कर्ज योजनेद्वारे बँका कमी दराने कर्ज देतात. आणि आपल्या नावे कमी खर्चात एखादी प्रॉपर्टि तयार होते.
2. कर्जावरील व्याज त्याला मिळणारे टॅक्स बेनिफिट ही सुद्धा एक चांगली बाजू आहे.
3. अशी प्रॉपर्टि चांगल्या ठिकाणी असेल तर चांगले भाडेकरू मिळून एक *पॅसिव्ह इन्कमचा * सोर्स तयार होतो.
4. ही प्रॉपर्टि गहाण ठेऊन सोप्या पद्धतीने आवश्यकतेनुसार कर्जही उपलब्ध होऊ शकते.
5. खरेदी विक्री आणि होणारा फायदा याची गणिते करणे सोपे जाते.
वरील फायदे अशी प्रॉपर्टि खरेदी करताना बिल्डर म्हणा किंवा संबधित बँकेचे अधिकारी आपल्यासमोर एक आशादायी चित्र निर्माण करतात पण अशा आशादायी चित्राच्या मागे वर नमूद केलेल्या फायद्यापेक्षा अनेक तोटे असतात ते पुढीलप्रमाणे
1. अशा मोठ्या प्रकल्पातील प्रॉपर्टि खरेदी करण्यासाठी फार मोठी रक्कम तयार करणे हे एक आव्हान असते.
2. प्रॉपर्टि आपल्या नावावर असली तरी याची विक्री करून हातात खेळते भांडवल केव्हा येऊ शकेल यासंबधी काहीही खात्री नसते.
3. मोठ्या रकमेची गुंतवणूक करून त्यानंतर त्याचे हफ्ते भरणे , देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवणे यासाठी नंतर अनेक वर्षापर्यंत आपल्याला आपले राहणीमान काटकसरीने ठेवणे भाग पडते.
4. आपणाला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागल्यास अशा प्रॉपर्टिमध्ये घुसखोरी होण्याची भीती असते .
5. केलेला खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांची तुलना हीच *गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये केल्यास * त्यातून मिळणार्‍या परताव्याशी केल्यास यामध्ये खूप तफावत जाणवू शकते.
6. आपली गुतंवणूक ही एका ठिकाणी अडकून पडल्यासारखी राहते.
7. आणि विक्री झाल्यास मिळणार्‍या रकमेवर भरावा लागणारा कॅपिटल गेन टॅक्स हा कसा वाचविता येईल यावर अनेक तंज्ञाची मते ऐकुन आपलाच गोंधळ उडू शकतो.
*आणि म्हणून सेकंड होम घेताना * त्याचे लोकेशन , शहराची भविष्यातील वाढ , आपली अपेक्षा, आपल्या कुटुंबाचे भविष्यातील प्लॅन या सर्वाचा विचार वरील फायदा तोट्याशी करून अंतिम निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे , असे मला प्रामाणिकपणे वाटते !
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!