प्रत्येक खरेदीदाराला “सेबी’च्या नियमांप्रमाणे “सीएजीआर’व्यतिरिक्त योजनेमधील रुपये 10 हजारांच्या गुंतवणुकीवर “पॉइंट टू पॉइंट’ रिटर्न दाखवणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे योजना सुरू झालेल्या दिवसापासूनचे व 12 महिन्यांप्रमाणे मागील तीन वर्षांच्या योजनेचे “रिटर्न्स’ दर्शवणे आवश्‍यक आहे.

“रिटर्न्स’ काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे की ऍब्सोल्यूट किंवा सिंपल रिटर्न, “सीएजीआर’ म्हणजेच कंपाउंडेड ऍन्युअलाइज्ड ग्रोथ रिटर्न, होल्डिंग पीरियड रिटर्न, टाइम वेटेड रिटर्न, मनी वेटेड रिटर्न आदी.

म्युच्युअल फंडामध्ये प्रचलित असलेल्या पहिल्या दोन पद्धतीमध्येसुद्धा सामान्य गुंतवणूकदारांचा कसा गोंधळ उडतो ते पाहू. समजा, सुनीलनने एखाद्या योजनेमध्ये एक लाख रुपये गुंतवले व तीन वर्षांनी ते दोन लाख झाले. एखादी व्यक्ती, “हे रिटर्न 100 टक्के आहेत,’ असे गुंतवणूकदाराला सांगू शकते (कारण ते ऍब्सोल्यूट किंवा सिंपल रिटर्न आहेत). गुंतवणूकदाराने जर त्या 100 टक्के “रिटर्न्स’ला सरळ तीनने भागले तर त्याला वाटेल, की रिटर्न दर वर्षाला 33 टक्के आहेत. परंतु त्याचे “सीएजीआर’ रिटर्न होते 25.99 टक्के.

म्युच्युअल फंड योजनांची विविध काळामधील रिटर्न्स आपण ऐकत असतो आणि पाहत असतो. बहुतांश गुंतवणूकदारांचा असा गैरसमज असतो, की त्यांनी त्या विशिष्ट योजनेमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांनासुद्धा तेच “रिटर्न्स’ मिळाले आहेत. परंतु प्रत्येक गुंतवणूकदाराचे “रिटर्न्स’ त्यांनी ज्या दिवशी गुंतवणूक केली आहे, त्या “एनएव्ही’ (निव्वळ मालमत्ता मूल्य) नुसार वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, एका नामवंत रिसर्च साईटनुसार, (8-2-12 ते 8-2-13), ऍक्‍सिस म्युच्युअल फंडाच्या “मिड कॅप’ योजनेमध्ये एका वर्षाचे रिटर्न्स 30.29 टक्के इतके आहेत. अनिल व सुनीलने या योजनेमध्ये साधारण एका वर्षापूर्वी गुंतवणूक केली. अनिलने 2-2-2012 रोजी गुंतवणूक केली आणि सुनीलने ती 10-2-2012 रोजी केली, तर त्यांना एका वर्षानंतर 11-02-2013 रोजी अनुक्रमे 33.29 टक्के आणि 28.59 टक्के रिटर्न्स मिळालेले दिसतील. केवळ आठ दिवसांमधील हा 4.7 टक्के फरक “एनएव्ही’मधील फरकाने आला, जी अनुक्रमे रुपये 9.85 व 10.21 अशी होती. “एनएव्ही’ ही बाजारावर अवलंबून असते. बाजारामध्ये जेवढा चढ-उतार जास्त, तेवढा “एनएव्ही’मध्ये फरक जास्त. या उदाहरणामध्ये “एक्‍स्पेन्स रेशो’ एकच धरला आहे; परंतु त्यामध्ये फरक पडला तरी “रिटर्न्स’मध्ये फरक पडू शकतो. “एक्‍स्पेन्स रेशो’ जेवढा जास्त, तेवढे रिटर्न्स कमी.

थोडक्‍यात, “डायरेक्‍ट’ पर्यायामुळे म्युच्युअल फंड उद्योगामधील “सल्लागारां’चे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. उलट, वर उल्लेख केलेल्या “रिटर्न्स’सारख्या अशा कित्येक गोष्टी आहेत, की ज्यासाठी सामान्य गुंतवणूकदारांनी सल्ला व सेवेसाठी हुशार, जाणकार व अनुभवी सल्लागाराची मदत घेणे योग्य ठरते.

 

अभिप्राय द्या!