जगभरात पुन्हा करोनाने धडकी भरवली आहे. डेल्टा व्हेरिएंटने गुंतवणूकदार चिंतेत असून त्यांनी उदयोन्मुख बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यास सुरवात केली आहे. त्याची झळ गेल्या आठवड्यात भारतीय बाजाराना बसली. पुढील आठवड्यात बड्या कोर्पोरेट्सचे तिमाहीत निकाल, वाहन विक्रीची आकडेवारी आणि रिझर्व्ह बँकेची पॉलिसी यावरून सेन्सेक्स-निफ्टीची दिशा ठरणार आहे.

शेअर निर्देशांकासाठी पुढील आठवड्यात बँकिंग, ऑटो आणि आयटी सेवा क्षेत्रातील घडामोडी महत्वाच्या ठरणार आहे. जुलैमधील वाहन विक्रीची आकडेवारी ऑटो शेअरला दिशा देईल. पुढील आठवड्यात प्राथमिक बाजारात चार आयपीओ बाजारात धडकणार आहेत. गेलनमार्क लाईफसायन्स या कंपनीची बाजारात नोंदणी होणार आहे. प्राथमिक बाजारातून गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली असल्याने सध्या आयपीओ तेजीत आहेत.

एचडीएफसी, भारती एअरटेल, एसबीआय, टायटन, डाबर, महिंद्रा अँड महिंद्रा, गेलं इंडिया, अदानी पोर्ट, हिंदाल्को यासारख्या दिग्गज कंपन्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. याशिवाय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकाकडून देखील तिमाही निकाल जाहीर केले जातील. ज्यात पीएनबी, बँक ऑफ बडोदा,आरबीएल बँक, डिसीबी, इंडियन ओव्हरसीज बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडून निकाल जाहीर केले जातील. याचे कमी अधिक प्रमाणात बाजार पडसाद उमटतील.

पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. यामध्ये प्रमुख व्याजदरांबाबत बँक काय निर्णय घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मागील पतधोरणात बँकेने प्रमुख व्याजदर स्थिर ठेवले होते. मागील आठवड्यात अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. त्यामुळे भांडवली बाजारात काही प्रमाणात तेजी परतली होती.

अभिप्राय द्या!