विवरणपत्र दाखल करताना खालील चुका टाळाव्यातच !!

1) करदाते आपले सर्व स्रोतांपासूनचे उत्पन्न दाखविण्यास विसरतात. जसे पगारदार करदाता केवळ आपले पगाराचे उत्पन्न घोषित करून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करतो; परंतु त्याचे इतर उत्पन्न जसे की भाडे, मुदत ठेवींवरील व्याज आदी घोषित करायचे राहून जाते. 2) सर्व बॅंक खात्यांचे तपशील आणि त्याचे आयएफएससी कोडे देणे आता अनिवार्य आहे; परंतु करदाते आपली सर्व खाती विवरणपत्रात नमूद करीत नाहीत. 3) करदाते करमुक्त उत्पन्न (शेती उत्पन्न, “पीपीएफ’वरील व्याज, शेअर्सवरील लाभांश आदी) दाखविण्याचे विसरतात. अशा उत्पन्नावर आपणास प्राप्तिकर भरावा लागत नसला तरी त्याची विवरणपत्रात नोंद होणे जरुरीचे आहे. 4) कलम 80 टीटीए नुसार बचत खात्यावरील व्याज 10 हजार रुपयांपर्यंत वजावटीस प्राप्त आहे; परंतु बरेच जण असे व्याज घोषित करीत नाहीत. बचत खात्यावरील असे व्याज आधी आपल्या इतर उत्पन्न या स्रोताखाली धरून मग त्याची कलम 80 टीटीए खाली वजावट घेतली गेली पाहिजे. 5) करदात्याच्या मालकीची एकापेक्षा अनेक घरे किंवा सदनिका दिसून येतात. प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता कोणतेही एक घर आपले राहते घर म्हणून दाखवू शकतो; परंतु त्याला इतर घरांपासूनचे उत्पन्न घोषित करणे अनिवार्य आहे. 6) काही जण विवरणपत्राचा चुकीचा फॉर्म दाखल करतात. प्राप्तिकर विभागाने आयटीआर 1, 2, 2ए, 3, 4, 4एस, 5 असे विविध प्रकारचे फॉर्म तयार केलेले आहेत. आपल्या उत्पन्न स्रोतानुसार योग्य ते विवरणपत्र दाखल करावे लागते. 7) विवरणपत्र दाखल करण्याआधी संबंधित वर्षाचा आपला फॉर्म 26एएस न विसरता पाहायला हवा. या फॉर्ममध्ये भरलेला प्राप्तिकर, उत्पन्नातून झालेली उद्‌गम करकपात (टीडीएस); तसेच संबंधित वर्षात प्राप्त झालेला प्राप्तिकर परतावा (रिफंड) आदींची माहिती असते. आपल्याला मिळालेल्या प्राप्तिकर परताव्यावर जर काही व्याज मिळाले असेल तर तेही घोषित करायला हवे. 8) व्यवसाय किंवा कमिशन आदी ठराविक उत्पन्न असलेल्या व्यक्तिगत करदात्यांना आयटीआर-4 फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये नफ्यातोट्याच्या माहितीबरोबर ताळेबंद (बॅंलन्सशिट) आदी माहितीसुद्धा नमूद करणे अनिवार्य असते. अशी माहिती न दिल्यास आपले विवरणपत्र हे “डिफेक्‍टिव्ह’ (त्रुटीयुक्त) होते व संबंधित माहिती पाठविण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. 9) विवरणपत्र ई-फाइल झाल्यावर “आयटीआर-व्ही’वर सही करून ती सीपीसी, बंगळूर येथे 120 दिवसांच्या आत पाठविणे जरुरीचे आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र हे अचूक आणि पूर्ण माहितीसह दाखल करायचे काम आहे; जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होऊ नये, हाच हा लेख लिहिण्यामागचा उद्देश!

अभिप्राय द्या!