काही खर्च असे असतात, की ते आपल्याला वर्षातून एकदाच करावे लागतात. त्यात सोसायटी मेंटेनन्स, आयुर्विमा हप्ता, मोटार विमा हप्ता, महापालिका मिळकत कर, नोकरांना बोनस आदी. अशा खर्चाचे नियोजन दरमहा गुंतवणूक करून केले तर वर्षअखेरीस त्या खर्चाचे ओझे वाटत नाही आणि दरमहा केलेल्या गुंतवणुकीवर व्याजसुद्धा (परतावा) मिळते. उदाहरणार्थ, आपल्या स्थावर मालमत्तेचा मिळकत कर आपल्याला एप्रिलमध्ये द्यावा लागतो. तो समजा, 12,000 रुपये आहे. त्यासाठी दरमहा 1000 रुपयांचे SIP (आर.डी.) खाते सुरू केले, तर त्यावर   7 ते 8 टक्के दराने व्याज मिळेल आणि एप्रिल महिन्यात एकरकमी 12,000 रुपयांचा मिळकत कर भरायला जड जाणार नाही. यापुढे जाऊन, एलआयसी म्युच्युअल फंड, तसेच बिर्ला म्युच्युअल फंडाने खूप छान सोय केली आहे. त्यांच्या लिक्विड फंडात आपण “एसआयपी’द्वारे दरमहा ठराविक रक्कम भरू शकतो आणि ही रक्कम ठराविक कालावधीनंतर आपण दिलेल्या सूचनेनुसार तुमचा (त्यांच्याच कंपनीच्या विमा योजनेचा) आयुर्विमा हप्ता थेट भरण्यासाठी वापरली जाते. थोडक्‍यात, या रकमेतून तुमचा आयुर्विमा हप्ता आपोआप, परस्पर भरला जातो. यामध्ये तुम्ही तिमाही, सहामाही किंवा वार्षिक विमा हप्त्याच्या पर्यायाचा अवलंब करू शकता. “एसआयपी’; तसेच आयुर्विमा हप्ता भरण्यासाठी कोठेही रांग लावावी लागत नाही, की कोणत्या कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही. घरबसल्या एका मोबाईल ऍपद्वारे दोन्ही कामे आपोआप होतात.

या प्रकारात तीन फायदे आहेत – 1) लिक्विड योजनेमध्ये बॅंकेपेक्षा थोड्या अधिक परताव्याचा फायदा. 2) एकदम एकरकमी पैसे न गुंतविता “एसआयपी’द्वारे दरमहा ठराविक थोडी रक्कम गुंतविता येते आणि 3) कोणताही  हप्ता आवश्‍यक त्या तारखेला आपोआप भरला जातो.

सध्या फ्लोटिंग फंडामध्ये  7.5  टक्के वार्षिक परतावा मिळतो .  कारण यामधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही.व त्याचा फायदासुद्धा आपण असे नियोजन करताना वापरू शकतो !!

अभिप्राय द्या!