उगवत्या नवीन वर्षात नवीन गुंतवणूक शैली घेऊन नवीन फंड घराण्याचा प्रवेश भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात होत आहे. त्या फंड घराण्याचे नाव आहे – सॅम्को म्युच्युअल फंड.

नुकतीच त्यांनी त्यांच्या पहिल्या योजनेची घोषणा केली. ही योजना गुंतवणूकदारांच्या पहिल्या पसंतीचा प्रकार असलेल्या ‘फ्लेक्सी कॅप’ प्रकारातील असेल; परंतु या योजनेची वैशिष्ट्ये सादर करताना प्रवर्तकांचा दृष्टिकोन ‘तणावमुक्त गुंतवणूक व जोखीम समायोजित परतावा’ असा असेल. योजनेत समाविष्ट असलेल्या कंपन्यांची ‘स्ट्रेस टेस्ट’ केली जाणार असून ज्या पात्र ठरतील अशाच कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान दिले जाईल.

भारतीय व जागतिक भांडवली बाजारात ६७,००० हून अधिक कंपन्या नोंदणीकृत (लिस्टेड) आहेत. अशा सर्व कंपन्यांची ‘स्ट्रेस टेस्ट’ करून गुंतवणूकयोग्य १२५ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. निफ्टी ५० मध्ये समाविष्ट असलेल्या ५० पैकी केवळ १५ कंपन्या ‘स्ट्रेस टेस्ट’ उत्तीर्ण करू शकल्या. योजनेत समाविष्ट होणाऱ्या कंपनीची निवड मूल्याधारित स्पर्धात्मक क्षमता, प्रशासकीय व्यवस्थापन कौशल्य, पारदर्शक ताळेबंद व कर्ज व्यवस्थापन, रोकड सुलभता, व्यवसायातील पुनर्गुंतवणूक व्यवस्थापन व वृद्धिक्षमता आणि कंपनी नियामकांच्या तरतुदींचे तंतोतंत पालन या सहा गुणात्मक मुद्द्यांवर केली जाईल. थोडक्यात, कुठल्याही आर्थिक चक्रात तग धरू शकणाऱ्या व नफा क्षमता टिकवून ठेवणाऱ्या कंपन्या या योजनेच्या भागभांडारात असतील.

कठोर निकषांचे पालन आणि आखून घेतलेल्या चौकटीमुळे सॅम्को फ्लेक्सी कॅप फंडात सेक्टोरल किंवा थीम्सचा लवलेश नसेल. यात बहुधा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, अर्थव्यवस्थेत कालचक्रांशी सुसंगत असलेले व्यवसाय, चांगल्या नाममुद्रा असलेल्या, परंतु अति कर्जभार असलेल्या कंपन्यांचा समावेश या योजनेत नसेल. पोर्टफोलिओ मंथन कमीत कमी राखण्याचा फंड घराण्याचा मानस आहे. कारण समभागांची वारंवार खरेदी-विक्री केल्यास योजनेचा ‘टोटल एक्स्पेन्स रेशो’ वाढतो व परिणामी गुंतवणूकदारास परतावा कमी मिळण्याची शक्यता असते.

पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंडासारखी या योजनेची बांधणी भासत असली तरीदेखील पराग पारीख ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ला अनुसरून गुंतवणूक करतात, तर सॅम्को ‘ग्रोथ इन्व्हेस्टिंग’चे अनुकरण करणार आहेत.

पारदर्शकता जपणारा हा फंड ६५ टक्के भारतीय कंपन्यांत गुंतवणूक करणार असून ३५ टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांत करणार आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक करण्यास हा एक योग्य पर्याय असू शकेल !!

अभिप्राय द्या!