आगामी पाच ‘आयपीओ’

आकाश एज्युकेशनल सव्‍‌र्हिसेस :

कोविड-१९ आणि लोकांचे प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर आलेल्या निर्बंधांचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग अद्यापही उघडलेली नाहीत. यामुळे तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या फायद्यांमुळे ‘एज्युटेक’ क्षेत्राची मागील काही तिमाहींमध्ये भरभराट झाली आहे. आकाश एज्युकेशनल सव्‍‌र्हिसेस ही अशा उद्योगातील ख्यातनाम आणि प्रतिष्ठित नाममुद्रा आहे. गुंतवणूकदार अल्प ते मध्यम कालावधीतील वाढीच्या मोठय़ा प्रवाहांमुळे हा  समभाग आपल्या पोर्टफोलिओत घेण्याचा  विचार करू  शकतात.

इक्सिगो :

ही आणखी एक नवीन युगाची तंत्रज्ञान कंपनी. विविध पर्यटन साकल्य (एग्रिगेशन) सेवा देणारी ही कंपनी असून ती लवकरच ‘आयपीओ’सह भांडवली बाजारात धडकण्याची शक्यता आहे. कंपनीने खासगी गुंतवणुकीतून मोठय़ा प्रमाणावर निधी उभा केलेला असला तरी प्रवर्तकांच्या मते दीर्घकालीन विस्तार प्रामुख्याने सार्वजनिक भागविक्रीमुळे होऊ शकतो. पुन्हा एकदा या भागविक्रीचे संपूर्ण भवितव्य आगामी महिन्यातील प्रवासाच्या आणि त्यावरील संभाव्य निर्बंधांच्या स्थितीवर अवलंबून असेल. कारण याचा थेट प्रभाव कंपनीच्या रोख प्रवाह आणि नफ्यावर पडेल.

सीएमएस इन्फो सिस्टिम्स :

सीएमएस हे वित्तीय आणि माहितीपूर्ण सेवांच्या क्षेत्रातील आणखी एक ख्यातनाम नाव आहे. त्यातून एटीएम रोख व्यवस्थापन, रिटेल रोख व्यवस्थापन, बँकिंग ऑटोमेशन सेवा, दूरस्थ मॉनिटिरग, कार्ड व्यवस्थापन इत्यादी विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. अलीकडच्या काळात ऑटोमेशन आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या डिजिटलायझेशनमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना या ‘आयपीओ’चे अचूक मूल्यांकन आणि किंमत याबाबत प्रश्न पडू शकतो. तरी एकूणच पोर्टफोलिओ विस्तारासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

ईमुद्रा :

देशातील डिजिटल क्रांतीचा आणखी एक प्रवर्तक म्हणजे ईमुद्रा. ही कंपनी लवकरच एक आयपीओ घेऊन येत आहे. डिजिटल स्वाक्षरी आणि ऑनलाइन आयडी पडताळणीतील ही कंपनी प्रवर्तक असून ती देशातील ओळख पूर्तता आणि ई-केवायसीचा दर्जा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. गुंतवणूकदार या कंपनीच्या समभागांसाठी बोली लावण्याची योजना आखत असताना, ईमुद्राच्या समभागासाठी निर्धारित विक्री किंमत आणि भविष्यातील तिच्या योजनांबाबत उत्सुक असू शकतात.

फ्लेअर रायटिंग सव्‍‌र्हिसेस :

मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण दुहेरी अंकातील वाढ सुरू असणारी, फ्लेअर रायटिंग सव्‍‌र्हिसेस ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय लेखन सामग्री आणि स्टेशनरी उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीची उत्तम पुरवठा साखळी आणि या क्षेत्रातील उत्तम अनुभवामुळे तिचा या क्षेत्रात उत्तम वचक आहे. कंपनीचा लौकिक, इतिहास आणि उत्तम वित्तीय स्थितीमुळे गुंतवणूकदारांना तिच्या समभागात स्वारस्य निर्माण होऊ शकते.

अभिप्राय द्या!