अदानी समूहातील अदानी विल्मर कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारण्याची आज शुक्रवारी घोषणा केली. कंपनीकडून ३६०० कोटींचे समभाग विक्री केले जाणार आहेत. २७ जानेवारी २०२२ पासून प्रारंभिक समभाग विक्री योजना खुली होणार असून यासाठी प्रती शेअर २१८ ते २३० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

एडब्ल्यूएल (AWL) ही अहमदाबादस्थित अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपची संयुक्त उद्योग कंपनी आहे. दोन्ही भागीदारांचा यात निम्मा हिस्सा आहे. फॉर्च्युन ब्रँडअंतर्गत खाद्य तेल आणि इतर वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. भांडवली बाजारात प्रवेश करणारी अदानी विल्मर ही अदानी समूहातील सातवी कंपनी ठरणार आहे.

२७ जानेवारी रोजी हा इश्यू खुला होणार असून ३१ जानेवारी २०२२ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या योजनेत किमान ६५ इक्विटी शेअरसाठी अर्ज करता येणार आहे.

अभिप्राय द्या!