ज्यांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे जमत नाही, जोखमीचे वाटते, अशा मंडळींना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो; पण म्युच्युअल फंडातही एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने जात दरमहा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. तरुण वयात थोडी जोखीम पत्करून, मुदत ठेवींऐवजी इक्विटी योजनांमध्ये जास्त रकमेचे “एसआयपी’ केले, तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळू शकते; पण “एसआयपी’ अधिक परिणामकारक आणि फायदेशीर होण्यासाठी काही बाबी जरूर लक्षात ठेवाव्यात.

केवळ “एसआयपीं’ची संख्या जास्त ठेवल्याने जोखीम कमी होते, असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकाच प्रकारच्या अनेक योजनांमध्ये “एसआयपी’ करण्यापेक्षा लार्ज कॅप, मिड कॅप, सेक्‍टोरल, बॅलन्स्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये विभागून करावी. “ऍसेट ऍलोकेशन’ वेगळे असेल, तरच जोखीम कमी होऊ शकते.

दर महिन्याच्या “एसआयपी’च्या रकमेत जर दरवर्षी 10 टक्‍क्‍यांनी वाढ केली तर दीर्घकाळात त्याचा चांगलाच फायदा होतो. म्हणजे पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 11,000, तिसऱ्या वर्षी 12,000 असे वाढवत नेल्यास 10 वर्षांनंतर मोठी रक्कम जमा होईल. अर्थातच, याचा फायदा अधिक वेगाने संपत्तीनिर्माणासाठी होईल, यात शंका नाही. त्यासाठी “स्टेप अप’ किंवा “टॉप अप’ पर्याय निवडावा; तसेच “एसआयपी पॉज’ म्हणजे तात्पुरते थांबवून नंतर “एसआयपी’ चालू करण्याचीही सोयही काही म्युच्युअल फंडांनी केली आहे.

उदा. “एसआयपी’ची रक्कम = रु. 10,000 दरमहा आणि परताव्याचा दर = वार्षिक 12 टक्के मानला आणि दरवर्षी “एसआयपी’च्या रकमेत 5 किंवा 10 टक्‍क्‍यांची वाढ केली, तर भविष्यात जमा होणाऱ्या रकमेत केवढा फरक पडतो, ते सोबतच्या तक्‍त्यावरून दिसून येईल.

मुदत————10 वर्षे——–15 वर्षे——–20 वर्षे

दरवर्षी वाढ———–जमा रक्कम (रु. लाख)——-

0%  ————23.0—-50.0————-98.9

5%————-27.6—–64.7————136

10%———–33.4——-85.9———–197

“एसआयपी’साठी ज्या बॅंकेतून दरमहा तुमची रक्कम जाणार आहे, त्याच खात्यावरचा चेक प्रथम द्यावा लागतो. जेथे “ईसीएस’ची सोय नाही, त्या ठिकाणी पुढील तारखेचे (पोस्ट डेटेड) चेक घेतले जातात. “एसआयपी’ची मुदत संपल्यानंतर त्यातील जमा रक्कम काढणे बंधनकारक नसते, आपल्या गरजेनुसार त्याबाबत निर्णय घ्यावा. “एसआयपी’ बंद न करताही जमलेल्या रकमेमधून पाहिजे तेवढी रक्कम काढता येते; तसेच 3 ते 4 आठवडे आधी सूचना देऊन “एसआयपी’ बंददेखील करता येतो किंवा थांबविता येतो. जोखीम कमी करण्यासाठी शक्‍यतो दोन “एसआयपी’च्या तारखांमध्ये अंतर ठेवावे. म्हणजे 5000 रुपयांचे दोन “एसआयपी’ असतील, तर ते 1 आणि 15 तारखेला; तर चार “एसआयपी’ असतील तर ते दर आठवड्याला एक, असे करता येतील. कोणत्याही कारणाने न भरले गेलेले “एसआयपी’चे हप्ते नंतर कधीही भरता येतात. ज्या दिवशी ती रक्कम भरली जाते, त्या दिवशीच्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) युनिट्‌स मिळतात. मागील हप्ते नंतर भरावे, अशी सक्ती नसते आणि त्यासाठी दंडही होत नसतो.

काही म्युच्युअल फंड (बिर्ला सनलाइफ, आयसीआयसीआय प्रु. आदी) 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना, मासिक हप्त्याच्या 100 पट (कमाल 10 लाख रुपये) विनामूल्य आयुर्विमा संरक्षण देतात. त्याचा फायदा घ्यावा; कारण या नेहमीच्याच योजना आहेत. इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) या करबचतीच्या योजनांसाठीसुद्धा “एसआयपी’ सुरू करता येते. अशा योजनेत नियमितपणे गुंतवणूक केल्यास करबचतीसाठी मार्चपर्यंत थांबण्याची गरज उरत नाही. इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये “एसआयपी’ केले, तर अल्पकाळातील उद्दिष्टांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

सातत्य आणि नियमितपणा या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या, तर “एसआयपी’द्वारे तुम्ही तुमची स्वप्ने साकार करू शकता.

 

चांगली कामगिरी असलेल्या काही योजनांची नावे नमुन्यादाखल पुढे दिली आहेत, ज्यांचा विचार गुंतवणुकीसाठी करता येऊ शकेल. लार्ज, लार्ज + मिड कॅप: बिर्ला सनलाईफ फ्रंटलाइन इक्विटी, फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा प्लस, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लू चिप, एसबीआय ब्लू चीप आदी. मिड कॅप/स्मॉल कॅप: फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज, डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रोकॅप, मिरे इमर्जिंग ब्लू चिप, रिलायन्स स्मॉल कॅप आदी.

मल्टिकॅप: आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी, आयडीएफसी प्रीमियर इक्विटी, रिलायन्स इक्विटी ऑपोर्च्युनिटीज, एल अँड टी व्हॅल्यू, यूटीआय ऑपोर्च्युनिटीज आदी.

बॅलन्स्ड:  टाटा बॅलन्स्ड, एचडीएफसी बॅलन्स्ड, UTI balanced

 

This Post Has One Comment

  1. YOGESH WASUDEO DHODARE

    छान वाटली माहिती आपल्याच मातृभाषेत

अभिप्राय द्या!