मला बऱ्याचवेळा गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचे अवलोकन करून काही बदल असल्यास सुचवा अशी विनंती करतात.

अश्या गुंतवणुकीदारांच्या पोर्टफोलिओ चे अवलोकन करताना बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे कि त्यांची गुंतवणूक कोणत्याही आर्थिक ध्येयाशिवाय केलेली असते. अश्या प्रकारच्या गुंतवणुकीत दूरदृष्टीचा अभाव असून ती दिशाहीन असते.

अशाच एका तरुण गुंतवणूकदारांचा ई-मेल आला आहे. मी त्याला सुचवलेला गुंतवणुकीचा फॉर्म्युला तुम्हालाही हा गुंतवणुकीचा फॉर्म्युला उपयोगी पडेल !!

ध्येय आधारित गुंतवणूक करा : मी नेहमीच सांगत असते की गुंतवणूकीची प्रक्रिया एखाद्या आर्थिक उद्दीष्टाला दृष्टिक्षेपात ठेऊन सुरु करा. बऱ्याचवेळा नुकतेच कमावते झाल्यावर नेमके आर्थिक लक्ष नसते. अश्यावेळेस संपत्ती निर्मिती हे लक्ष असू शकते. बरेच तरुण गुंतवणूकदार अश्या लक्ष्याला डोळ्या समोर ठेऊन गुंतवणूक करतात

एकदा का आर्थिक लक्ष ठरवले कि त्याचबरॊबर ठरवावा त्या लक्ष्याला गाठण्याचा कालावधी . येथे या तरुण गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट आहे संपत्ती निर्मिती पण त्यासाठी त्याने कालावधी ठरवलेला नाही. तो या ध्येयाच्या टर्मबद्दल निश्चित नसल्याचे दिसते आहे. स्वतःला दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणवतो, परंतु त्याच्या साठी दीर्घकालीन काय आहे यात त्याचा गोंधळ आहे. हे आर्थिक लक्ष ५ वर्षे, १० वर्षे, २० वर्षे किंवा ३० वर्षांसाठी आहे? त्याला अजून ठरवायचे आहे. खरे पाहता दीर्घकालीन लक्ष तसे २०+ वर्षांचे असते. गुंतवणूकदारांकडे खरोखर इतका गुंतवणुकीसाठीचा वेळ आणि गुंतवणूकीत सातत्य ठेवण्याचे धैर्य असेल तर वास्तविक चक्रवाढ व्याजाचा परिणाम दिसून येईल. म्हणूनच ध्येय गाठायची मुदत काय आहे हे प्रथम ठरवणे गरजेचे आहे.

मग या उद्दीष्टपूर्ती साठी लागणाऱ्या गुंतवणूकी चे मालमत्ता वाटप (asset allocation ) कश्या प्रकारे हवे याचा निर्णय घ्यावा लागतो मालमत्तेचे वाटप लक्ष्याच्या कालावधीवर तसेच गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता यावर निश्चित केले जाते. गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता त्याचे वय, सध्याचे उत्पन्न, भविष्यातील उत्पन्न निर्मिती क्षमता, सध्याचे नेटवर्थ आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असते. तरुण गुंतवणूकदारांच्या बाबतीत त्यांचे सध्याचे वय आणि उद्दीष्टे यांचा विचार करता ते इक्विटी मालमत्ता वर्गात आक्रमकरित्या गुंतवणूक करू शकतात .

परंतु तरीही मी सगळ्या तरुण गुंतवणूकदारांना सल्ला देत असते की इक्विटी आणि डेटचे ६५:३५ या रेशो चे अनुसरण करा.

त्यानंतर आर्थिक उत्पादनाची निवड करण्याची प्रक्रिया सुरु होते . आपल्या या गुंतवणूकदाराला २५००० रुपये गुंतवायचे आहे. चला तर मग या गुंतवणूकदाराला गुंतवणूक कशी करावी ते सुचवू या

या तरुण गुंतवणूकदाराच्या बाबतीतआपण जर ६५:३५ या रेशो चे अनुसरण केले तर त्याची इक्विटी गुंतवणूक १६२५० रुपये आणि डेट गुंतवणूक रू. ८७५० अशी होईल. . इक्विटी मालमत्ता वर्गात गुंतवणूक करतांना खालील प्रमाणात म्युच्युअल फंड निवडा

 ५०% इंडेक्स फंड / लार्ज-कॅप
३५% मल्टीकॅप फंड
१५% हायब्रीड इक्विटी फंड

डेट मालमत्ता वर्गात गुंतवणूक खालील प्रमाणात म्युच्युअल फंड निवडा

 लिक्विड फंड / ओव्हर नाईट फंडामध्ये ५०%
आर्बिटरेज फंड / मनी मार्केट फंडात ५०%

 

वर्षातून एकदा आपल्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्यास विसरू नका आणि आपल्या निवडलेल्या मालमत्ता वाटपानुसार ते संतुलित करा.

अश्या प्रकारे केलेकी गुंतवणूक ध्येय लक्ष्य केंद्रित गुंतवणूक असते आणि ती दीर्घकालीन सुरु राहते.

अभिप्राय द्या!