डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागातील घसरणीमागे, कंपनीच्या व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण बुधवारी दिले. सूचिबद्धतेपश्चात सार्वकालिक नीचांकापर्यंत निरंतर सुरू असलेल्या समभागाच्या घसरणीची मुंबई शेअर बाजाराने दखल घेत मंगळवारी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे त्याबाबत स्पष्टीकरण मागविले होते.

इतिहासातील सर्वात मोठी समभाग विक्री ठरलेल्या भांडवली बाजारातील ‘पेटीएम’च्या समभागांचे पदार्पण गुंतवणूकदारांसाठी स्वप्नभंग ठरले होते. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले होते. तर प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग २,१५० रुपये किमतीला मिळविलेल्या समभागात आतापर्यंत ७४.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. आयपीओद्वारे २,१५० रुपयांना समभाग मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांना, १८ नोव्हेंबर २०२१ च्या समभागाने बाजारात पहिले पाऊल ठेवल्यापासून, प्रति समभाग १,६२६ रुपये गमावले आहेत. मागील साडेचार महिन्यांत समभागाने तीन-चतुर्थाश बाजार भांडवली मूल्य गमावले आहे.

अभिप्राय द्या!