रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदरकपातीच्या धोरणामुळे सर्व बॅंकांनी आणि टपाल (पोस्ट) खात्याने आपल्या योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे आणि ती यापुढेही चालू राहणार आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे. अशा वेळेस बॅंकेच्या किंवा पोस्टाच्या योजनांच्या व्याजावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होण्याची शक्यता आहे. कारण मिळणारे व्याज कमी-कमी होणार आणि खर्च मात्र वाढत राहणार. अशा वेळेला त्यांच्यापुढे दोनच मार्ग उरणार आहेत. एकतर खर्च कमी करणे किंवा कमी झालेल्या व्याजाची भरपाई करण्यासाठी अजून जास्त गुंतवणूक करणे. खर्च कमी करणे सर्वांनाच जमेल, असे नाही. मात्र, कमी होणाऱ्या व्याजाची भरपाई परत बॅंकेत किंवा पोस्टाच्या योजनांत कमी दराने जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त व्याज किंवा परतावा देणाऱ्या काही संधी आहेत का, हे पाहावे लागेल. यासाठी आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत थोडाफार बदल करावा लागेल. हा बदल म्हणजे फारशी जोखीम न पत्करता कमी व्याजातच नवीन गुंतवणूक करणे किंवा थोडी जोखीम पत्करून जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत गुंतवणूक करणे हा होय.
शेअर्स/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
बऱ्याच गुंतवणूकदारांचे लक्ष शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे गेलेले नसते. शेअर्स म्हणजे आपले पैसे बुडणार, अशा गैरसमजुतीतून ते आपली संधी घालवत असतात. शेअर्समध्ये अनेक प्रकाराने व्यवहार करता येतात. घेतलेला शेअर वाढल्याशिवाय विकायचा नाही. शेअर बाजार महिन्यातून 7-8 वेळेला बराच वर जातो किंवा 7-8 वेळा बराच खाली येतो. मधल्या वेळेला तो स्थिर असतो. अशावेळी थोडा अभ्यास करून काही शेअर्स निवडता येऊ शकतात. असे शेअर आपल्याला बॅंक किंवा पोस्टाच्या योजनांच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. हा परतावा म्हणजे घेतलेल्या शेअर्सचा भाव आणि विकलेल्या शेअर्सच्या भावातील फरक असतो. याशिवाय त्या कंपनीने लाभांश किंवा बोनस भाग जाहीर केला असेल आणि जाहीर केलेल्या दिवशी असे शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात असतील तर तो जादा परतावा म्हणून गृहित धरता येईल.
चांगला परतावा देणाऱ्या काही कंपन्या
अशोक लेलॅंड , बजाज फायनान्स बायोकॉन सिएट टायर्स , डिशमन , फोर्स मोटर्स , ज्युबिली लाईफ ,, एचडीएफसी बॅंक , हिरो मोटोकॉर्प , एचपीसीएल , इंडसइंड बॅंक ,दिवाण फायनान्स
ज्यांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे शक्य होत नाही, त्यांना म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळविता येऊ शकतो.
कमी-कमी होणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नामुळे हवालदिल न होता आणि बॅंकेत किंवा पोस्टात सर्व गुंतवणूक करण्यापेक्षा काही प्रमाणात वरील मार्ग निवडला तर एखाद्या नव्या गुंतवणूक क्षेत्राची ओळख होईल; शिवाय अधिक परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. वार्षिक खर्च भागविण्यासाठी जी रक्कम कमी पडणार आहे, तेवढे व्याज किंवा परतावा देणारी गुंतवणूक चांगल्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामधून करावी. ही गुंतवणूक अतिरिक्त असू शकेल किंवा केलेल्या गुंतवणुकीतून तेवढी रक्कम बाहेर काढून शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतविली तर मिळणाऱ्या जादा परताव्यामुळे फारशी काळजी करावी लागणार नाही.