जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा बहुतेक वेळा सामान्य गुंतवणूकदार काय करतात?

आपल्यापैकी बरेचजण प्रसिद्ध वेबसाइटवर जातात आणि म्युच्युअल फंडाची स्टार रेटिंग पाहतात. आपल्याला एकाच वेबसाइटवर अवलंबून राहणे धोक्याचे वाटत असल्याने आपण अशा २/३ वेबसाइट्सवर जाऊन स्टार रेटिंग तपासतो आणि या सगळ्या वेबसाइटवर ज्या म्युच्युअल फंडाचे नाव असेल अशा फंडाला पसंती दर्शवतो.

आपली मासिक गुंतवणूक ५/१० हजार जरी असेल तरीही आपण ४/५ स्टार फंडांची निवड करतो. १/२ हजाराची गुंतवणूक करताना ५ फंडांची निवड केल्यास आपल्याला वाटते कि आपण आपल्या जोखमीला कमी केले .

परंतु असे करून आपण खरोखरच गुंतवणुकीत वैविध्य आणले की त्याच त्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ओव्हर लाँपिंग करतो आहे का याची तपासणी करणे जरुरी आहे. का आपण स्टार रेटिंग मापदंडांचे डोळेझाक करुन अनुसरण करतो आहोत आणि गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेल्या विचारप्रक्रियेविना गुंतवणूक सुरू करतो आहोत?

आता जेव्हा सामान्य गुंतवणूकदार अशा स्टार रेटिंगच्या आधारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात तेव्हा अशा गुंतवणूकदारांना वाटते की आता त्यांचे एक मोठे काम झाले आणि आता निवडलेले म्युच्युअल फंड कोणत्या लक्ष्यासाठी मॅप करायचे हे ठरवायचे आहे. पण हे करणे इतके सोपे नाही.

कधीकधी असे आढळून येते की बहुतेक गुंतवणूकदारांनी ज्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे त्या फंडाचे स्वरूपच माहित नसते, त्यांना त्याचा प्रकार, त्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकीचे तत्वज्ञान आणि त्यातील मूळ धोका माहित नसतो. तर कधीकधी अल्प-मुदतीच्या लक्ष्यांसाठी, ते व्हॅल्यू फंड / कॉन्ट्रा फंड किंवा अगदी मिड / स्मॉल-कॅप फंडाची निवड करतात अथवा निवडलेले असे फंड छोट्या अवधीच्या लक्षांना जोडतात.

६ महिने किंवा एक वर्षानंतर जेव्हा ते पुन्हा स्टार फंडांच्या यादीची तपासणी करतात तेव्हा बऱ्याच वेळा असे आठळून येते की निवडलेले बरेच म्युच्युअल फंड या यादीबाहेर आहेत किंवा आहे त्यांचे रेटिंग खाली आले आहे. त्यांचे फंड पहिल्या पाचात नाहीत आणि अशा परिस्थितीत इक्विटी गुंतवणूकीवरील त्यांचा विश्वास डगमगतो. ते घाईघाईने पूर्वीच्या निवडलेल्या इक्विटी फंडातून बाहेर पडून नवीन स्टार-रेटेड फंडांमध्ये गुंतवणूक सुरू करतात आणि त्याच चुकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहतात

अशा प्रकारे म्युच्युअल फंडाची निवड करणे खूप धोकादायक आहे आणि त्यात स्थिरता आणि दीर्घ मुदतीसाठी सातत्याने गुंतवणूक करण्याची क्षमता नसते. कृपया हे ध्यानात घ्या की बर्‍याच वेबसाइटवर फंडांची केवळ एक वर्षाची कामगिरी लक्षात घेऊन रेटिंग ठरवली जातात. अश्या वेबसाईट इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडासाठी सामान्य यादी प्रकाशित करतात ज्यात बहुतेक सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडाच्या श्रेणी एकत्र असतात.

इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये लार्ज-कॅप, मल्टी-कॅप, मिड-कॅप्स, व्हॅल्यू फंड्स, कॉन्ट्रा फंड्स, थीमॅटिक / सेक्टरियल, फ्लेक्सिकॅप फंड्स आणि स्मॉल कॅप्स हे सर्व समाविष्ट असतात . म्हणून कधीकधी जर लार्ज-कॅप क्षेत्र चांगला परतावा देत असेल तर आपल्याला त्या यादीमध्ये ३ लार्ज-कॅप्स सापडतील किंवा जेव्हा मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्र चांगला परतावादेत असेल यादीत त्यांचे नाव पुढे असेल. आणि जर आपल्याला म्युच्युअल फंडाचे स्वरूप समजू शकत नसेल तर आपण समान श्रेणीतीलच फंड खरेदी करण्याची चूक करतो आणि नंतर पश्चाताप होतो

जर तुम्हीही अश्या प्रकारानेच न जाणता इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही नक्की वरील उल्लेखलेल्या बाबींशी संमत असाल.

आणि हे टाळण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे खूपच महत्वाचे आहे !

अभिप्राय द्या!