पन्नास लाखांचा मुदत विमा काढल्यास (टर्म इन्शुरन्स) मृत्यू झाल्यानंतर खरंच पन्नास लाख रुपये मिळतात का?
टर्म इन्सुरन्सचा अर्थ प्रथम समजून घेऊया!
टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमच्या आयुष्याचा विमा.
जितक्या वर्षांचा विमा उतरविला गेला असेल, तितक्या वर्षांच्या आत जर विमाधारकाच्या बाबतीत काही बरीवाईट घटना घडली, तर त्याच्या कुटुंबाला विम्याची पूर्ण रक्कम मिळते.
उदा: जर ‘अ’ ने, वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपला पन्नास लाखांचा जीवन विमा उतरवला, तर त्याला पुढील पन्नास वर्षे, म्हणजे त्याच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षांपर्यंत (टर्म इन्सुरन्सची जास्तीत जास्त मर्यादा), दरवर्षी ₹.4,400 (अंदाजे) इतका हप्ता भरावा लागेल.
त्याचवेळी, त्याचा मित्र ‘ब’ ने तितकेच ₹.4,400 बँकेत आरडी मध्ये गुंतविण्यास सुरवात केली असे मानुया.
इथे टर्म इन्सुरन्सच्या बाबतीत एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, की ही आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या हितासाठी बनवलेली योजना आहे.
कोणत्याही प्रकारे या योजनेची तुलना इतर गुंतवणुकीच्या योजनांबरोबर करू नये!
आता आपण वरच्या उदाहरणाकडे वळूया :
आज, पस्तीसाव्या वर्षी, ‘अ’ विवाहित असून त्याची पत्नी ‘गृहिणी’ आहे. ते ज्या घरात राहतात, त्यावर, तसेच त्यांच्या चार चाकी वाहनावर बँकेचे कर्ज आहे. त्यांची दोन्ही मुले इंग्रजी शाळेत जातात, जिथे त्यांचा वार्षिक खर्च प्रत्येकी पन्नास हजार रुपये आहे.
त्याचा मित्र ‘ब’ ची परिस्थितीही जवळजवळ सारखीच आहे.
नववर्षानिमित्त गोव्याला जात असताना दुर्दैवाने त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्या दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला.
‘अ’ च्या पत्नीला आता विम्याचे पन्नास लाख रुपये ताबडतोब मिळतील, ज्यामुळे तिला आता घर आणि गाडी विकावी लागणार नाही, मुलांची शाळा अव्याहतपणे चालू राहील आणि त्यांच्या जीवनशैलीवर कोणताही परिणाम होणार नाही.
‘ब’ च्या पत्नीला बँकेकडून आरडी चे अंदाजे सात लाख पंचवीस हजार रु मिळतील.
विमा आणि गुंतवणूक या दोघांमधला हा फरक!
लोक विम्याकडेही गुंतवणूक म्हणून पाहतात !
जर मुदत पूर्ण होईपर्यंत काही दुर्घटना घडली नाही, तर विमाधारकास काहीच मिळत नाही.
पण उदंड आयुष्य लाभणं हा ही एक बोनसच नव्हे का?
टीप : सर्व कंपन्या “अपघाती मृत्यू” साठी थोडा अधिक प्रीमियम आकारून दुप्पट संरक्षण देतात, म्हणजे पन्नास लाखा ऐवजी 1 कोटी.