ब्लू चीप शब्द कसा आला?
ब्लू चीप हा शब्द कोठून आला याची माहिती आपण अगोदर करून घेऊया. १९ व्या शतकात अमेरिकेत पोकर हा खेळ प्रतिष्ठेचा होता. या खेळात पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगाच्या चीप्स म्हणजे चकत्या वापरल्या जायच्या. या चीप्सचे मूल्य अनुक्रमे १ डाॅलर, ५ डाॅलर आणि २५ डाॅलर असे. म्हणजे यामध्ये निळ्या रंगाच्या चीप्सचे मूल्य सर्वाधिक होते. त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात उच्च मूल्यासाठी ब्लू चीप शब्द वापरण्याची परंपराच झाली. त्यानंतर याची व्याप्ती वाढत जाऊन उच्च मूल्यांकन असलेल्या मालमत्तेसाठीसुद्धा ब्लू चीप हा शब्द वापरला जाऊ लागला. अमेरिकन शेअर बाजारात १९२० च्या सुमारास उच्च भावातील शेअर्स किंवा उत्तम प्रतीचे शेअर्स यासाठी ब्लू चीप हा शब्द प्रचलित झाला.
हळूहळू ब्लू चीप शब्दाचा वापर शेअर बाजारातील ज्या कंपन्या सर्वाधिक भरवशाच्या आहेत त्यांच्यासाठी वापरला जाऊ लागला. ब्लू चीप कंपन्या बाजार भागभांडवलात (market capital) मिड कॅप किंवा बहुतांशी लार्ज कॅप कंपन्या असतात. या कंपन्या आपल्या उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्या असतात. या कंपन्यांचे बाजारात एक भरवशाची कंपनी म्हणून चांगले नाव असते. त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये नियमीत नफा कमावण्याची क्षमता असते. या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश (dividond) ही देतात. त्यामुळे या कंपन्यांना गुंतवणुकदारांची पहिली पसंती असते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी चढ-उतारही होत असते. त्यामुळे ट्रेडर्सचीही या कंपन्यांच्या शेअर्सना पसंती असते. शेअर बाजारात ब्लूचीप कंपनीच्या शेअर्सना ब्लूचीप शेअर्स म्हणतात. ब्लूचीप शेअर्स गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जातात.