आर्थिक वर्ष २०२१-२२ चे विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. ज्या करदात्यांना त्यांच्या लेख्यांचे, कोणत्याही कायद्यानुसार, लेखा-परीक्षण (ऑडिट) बंधनकारक नाही अशा करदात्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. मागील दोन वर्षांत करोनामुळे विवरणपत्र भरण्याला मुदतवाढ मिळाली आहे, पण यावर्षी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वेळेत विवरणपत्र दाखल करा अन्यथा कुचराई, दिरंगाईचे परिणाम करदात्यांसाठी गंभीर आर्थिक व मानसिक  मनस्ताप देणारेही ठरू शकतात.

विवरणपत्र कोणी दाखल करावे?      

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. कमाल करमुक्त मर्यादा खाली दर्शविली आहे :

  • ज्या वैयक्तिक करदात्याचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यासाठी २,५०,००० रुपये

  • ज्या वैयक्तिक करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ३,००,००० रुपये,

  • ज्या वैयक्तिक करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे यासाठी ५,००,००० रुपये

ही उत्पन्नाची मर्यादा ‘कलम ८० सी’, ‘८० डी’, ‘८० जी’, ‘८० टीटीए’, ‘कलम ५४’, ‘कलम ५४ एफ’ आणि ‘कलम ५४ ईसी’ वगैरे कलमांच्या वजावटीं घेण्यापूर्वीची आहे. जे करदाते अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यासाठी कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच असेल, त्यांना वयानुसार मिळणाऱ्या वाढीव मर्यादेचा लाभ घेता येत नाही.

सूट कुणाला आणि त्या संबंधाने अपवाद काय?

ज्या करदात्यांचे उत्पन्न वर दर्शविलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे त्यांना विवरणपत्र भरणे अनिवार्य नाही. मात्र त्यांनी आर्थिक वर्षांत खालील व्यवहार केलेले असतील तर त्यांना विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

*  एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बॅंकेच्या चालू खात्यात रोखीने जमा केली असल्यास, किंवा

*  दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या परदेश प्रवासासाठी खर्च केली असल्यास (या प्रवासात सूचित केलेल्या शेजारी देशात किंवा तीर्थयात्रेसाठीच्या प्रवासाचा समावेश नाही), किंवा

*  एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वीज बिलापोटी खर्च केली असल्यास.

*  या वर्षीपासून यामध्ये खालील व्यवहारांची भर पडली आहे :

*  उद्योगाची एकूण विक्री, जमा, उलाढाल आर्थिक वर्षांत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,

*  व्यवसायाची एकूण जमा आर्थिक वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,

*  उद्गम कर (टीडीएस) आणि गोळा केलेला कर (टीसीएस) आर्थिक वर्षांत २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, (निवासी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये असेल)

*  एका किंवा जास्त बचत खात्यात आर्थिक वर्षांत ५० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल.

शिवाय ज्या निवासी भारतीयांची भारताबाहेर संपत्ती असेल किंवा भारताबाहेरील संपत्तीत फायदेशीर मालकी असेल किंवा भारताबाहेरील खात्यात सही करण्याचा अधिकार असेल तर त्या करदात्याला विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

निर्धारित ३१ जुलै २०२२ पर्यंत विवरणपत्र दाखल न केल्यास परिणाम काय?

ज्या करदात्यांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे, परंतु काही कारणाने करदाता विवरणपत्र या मुदतीत दाखल न करू शकल्यास त्याचे परिणाम :

  • विलंब शुल्क : विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्यास ५,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना फक्त १,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

  • व्याजामध्ये नुकसान : करदात्याने विवरणपत्र मुदतीत दाखल केल्यास करदात्याच्या करपरताव्यावर (रिफंड) १ एप्रिल (२०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी १ एप्रिल २०२२ पासून) पासून ते परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत, वार्षिक ६ टक्के या दराने व्याज मिळते. करदात्याने विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्यास ज्या दिवशी विवरणपत्र दाखल केले त्या दिवसापासून परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळते. करदात्याचा कर देय असेल तर त्यांना ‘कलम २३४ ए’ आणि ‘कलम २३४ बी’नुसार दरमहा प्रत्येकी १ टक्का या दराने व्याज भरावे लागते.

  • तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येत नाही : भांडवली तोटा, धंदा-व्यवसायातील तोटा हा विवरणपत्र मुदतीत भरले तरच कॅरी-फॉरवर्ड करता येतो आणि पुढील आठ वर्षांपर्यंत (सट्टा व्यवहारातील तोटय़ासाठी चार वर्षे) उत्पन्नातून वजा करता येतो. ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा हा मात्र विवरणपत्र वेळेत दाखल केले नसले तरी कॅरी-फॉरवर्ड करता येतो.

मागील दोन वर्षांत करोनामुळे याला मुदतवाढ मिळत गेली आहे. या वर्षीसुद्धा ती मिळेल याची वाट न बघता विवरणपत्र दाखल करावे.

Leave a Reply