आज १५ ऑगस्ट रोजी आपण ७६ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत.

स्वातंत्र्य या शब्दात एक जादू आहे, हा शब्द शुद्ध हेवेत घेतलेल्या मोकळ्या श्वासासारखा अनुभव देऊन जातो. भारतीय राज्य घटनेने आपल्याला बरेच मूलभूत हक्क दिले आहेत. ते सगळे एक प्रकारचे स्वातंत्र्यच आहे. माणसाला जगण्याची मोकळीक मिळाली म्हणजे त्याच्यातील प्रतिभेला उभारी मिळते आणि तो उतुंग शिखरे पदांकृत करण्याचे ध्येय स्वतः समोर ठेवतो. मनातील ऊर्जेचा स्रोततच मुळी आपल्याला कडे असणारे स्वातंत्र्य असते .

पारतंत्र्य या शब्दाची वेदना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जाणली आणि त्यातून आपल्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले. आत्ताच्या स्वतंत्र भारतात इंग्रज सरकारच्या पारतंत्र्याची बोचरी जाणीव आपण अनुभवत नसलो तरी अजून ही आपण पारतंत्र्य या शब्दाला कवटाळूनच ठेवलेले आहे. आपण शासकीय पारतंत्र्यात जरी नसू तरी समाजजीवनात आपण वेगवेगळ्या पातळीवर पारतंत्र्य अनुभवत आहोत.

रूढी परंपरेच्या नावाखाली चुकीने लादलेले पारतंत्र्य, जातीच्या शिक्क्यातून अनुभवलेले असपृश्यतेचे पारतंत्र्य, लिंगभेदाच्या तराजूत तोलतांना समाजाच्या अर्ध्या लोकसंख्येला सोसावे लागणारे पारतंत्र्य आणि गरीब श्रीमंत या आर्थिक पातळीवर होणाऱ्या शोषणातून गरिबांना सोसावे लागणारे आर्थिक पारतंत्र्य .

सामान्यतः सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्यम वर्गीयांमध्ये वरील उल्लेखिलेले पारतंत्र्याचे दाखले हळूहळू नाहीसे होत आहेत. परंतु हा वर्ग अजूनही एका प्रकारच्या पारतंत्र्यात जखडून पडलेला आहे. ह्या पारतंत्र्याचे चटके कमी अधिक प्रमाणात असून नेहमीच जाणवले जातात असे नाही आणि म्हणूनच बऱ्याचवेळा या पारतंत्र्याची जाणीवच होत नाही. हे पारतंत्र्य म्हणजेच आर्थिक पारतंत्र्य.

अशा या आर्थिक पारतंत्र्याच्या जोखडातून बाहेर पडून आर्थिक विवंचनेच्या जाचातून मुक्त करणारे स्वातंत्र्य म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य.

आर्थिक स्वातंत्र्य ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार पैशांच्या बाबतीत विचार करणे थांबवून जीवनाचा मनमुराद आनंद उपभोगू याचा आत्मविश्वास वाटू लागल्यावर अनुभवू शकतो.

आर्थिक स्वातंत्र्य फक्त नोकरी व्यवसाय स्वरोजगारामुळे येणाऱ्या उत्पन्नामुळे मिळत नाही. असे उत्पन्न तुमचे दैनंदिन जीवन जगण्याचे साधन असते परंतु बराचवेळ आपण ही मिळकत सुरु झाल्यावर आर्थिक स्वतंत्र झालो अशी समज करून घेतो . ही समजूतच मुळी चुकीची आहे. जो पर्यंत आपण अशा मिळकतीवर आपले दैनंदिन जीवन जगणे अवलूंबून ठेवतो तो पर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य पासून दूर असतो.

आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे कारण नोकरी/ स्वरोजगार आणि व्यवसायाची ची सुरक्षा हा एक भ्रम आहे.

  • आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे आहे कारण जर आपण आर्थिक स्वतंत्र झालो तर आपण “रॅट रेस” मध्ये जास्त काळ अडकून पडत नाही
  • आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे कारण याचा अर्थ असा की आपण इतरांना मदत करण्यासाठी चांगल्या आर्थिक स्थितीत आहात.
  • आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे कारण याचा अर्थ असा की फक्त भौतिक आनंदपेक्षा खरा मानसिक आनंद आपल्याला चिंतामुक्त झाल्यावरच अनुभवता येतो.
  • आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे आहे कारण ते आपल्यास आपली स्वप्ने, आशाआकांक्षा, छंद पूर्ण करण्यासाठी आपली कार्यक्षमता वाढवते.

जसे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलाढ्य इंग्रज सरकार ला नमवू शकतो असा विश्वास बाळगून जोमाने प्रयत्न केले व आपणास स्वातंत्र्य मिळवून दिले तसाच आत्मविश्वास बाळगून आपण ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो.

सध्या चा काळ हा माहिती चे युग आहे. सर्वांना प्रचंड संधी व नवनविन साधने उपलब्ध आहेत . गरज आहे ती आत्मविश्वासाने व जोमाने प्रयत्न करण्याची.

या आजच्या स्वातंत्र्यदिनी चला नवे उद्दिष्ट ठेवू या.. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचे !!!

अभिप्राय द्या!