काळानुसार महागाई ही सर्वच क्षेत्रांत वाढलेली आहे. या नियमाला शिक्षण क्षेत्रदेखील अपवाद नाही. अलीकडे शैक्षणिक खर्चांमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्याने अनेकजण शैक्षणिक कर्ज घेताना दिसतात. अशा या शैक्षणिक कर्जावर प्राप्तिकर सवलतमिळते .
कलम 80-ई
वैयक्तिक करदाता सोडून इतर करदात्यांसाठी (जसे हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, कंपनी आदी) या कलमाखाली सवलत मिळत नाही. शैक्षणिक कर्जावरील भरलेल्या केवळ व्याजाचीच सवलत मिळते. शैक्षणिक कर्ज हे वित्तीय संस्था (बॅंक आदी) किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडूनच घेणे अनिवार्य असते. शिवाय, शैक्षणिक कर्ज हे उच्चशिक्षणासाठी घेतले गेलेले पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अशी, की या कलमात कोठेही उच्च शिक्षण हे भारतातच घेतले गेले पाहिजे, असा उल्लेख नसल्यामुळे भारताबाहेर अर्थात परदेशात केलेल्या उच्च शिक्षणासाठीसुद्धा सवलत मिळायला हरकत नाही. असे शैक्षणिक कर्ज आपल्या स्वतः किंवा आपल्या जोडीदार किंवा आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतले गेले असावे. एखाद्या मुलाचे जर आपण कायदेशीर पालक असाल, तरीदेखील तुम्ही सवलत घेण्यास पात्र असाल. शैक्षणिक कर्जावरील भरलेले व्याज हे तुमच्या करपात्र उत्पन्नातून दिले गेले पाहिजे. थोडक्यात, असे उत्पन्न ज्यावर प्राप्तिकर माफी आहे (जसे शेती उत्पन्न, लाभांश आदी) अशा उत्पन्नातून व्याजाची रक्कम भरता कामा नये.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे शैक्षणिक कर्ज , जी व्यक्ती सवलत घेणार आहे, त्याच्या स्वतःच्या नावावर असणे गरजेचे आहे.
यामध्ये संपूर्ण व्याजाची रक्कम तुम्हाला सवलत म्हणून मिळते. थोडक्यात, राहत्या घरावरील गृहकर्जाच्या व्याजावर मिळणाऱ्या सवलतीवर जशी रु. दोन लाखांची मर्यादा आहे, तशी येथे काहीही मर्यादा नाही. मात्र, शैक्षणिक कर्जाची सवलत जास्तीत जास्त आठ वर्षेच घेता येऊ शकते. कारण आठ वर्षांनंतर जरी तुमचे शैक्षणिक कर्ज चालू राहिले तरी त्याच्या व्याजावरील सवलत नंतर तुम्हाला मिळणार नाही.
बऱ्याच जणांनी त्यांच्या स्वतःसाठी किंवा जोडीदारासाठी किंवा आपल्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज तर घेतले आहे; परंतु त्यांना या कलम 80-ईच्या सवलतीबाबत काहीच कल्पना नव्हती, असे लक्षात आल्यामुळे हा लेख लिहावा असे वाटले. त्यामुळे दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर संबंधित बॅंकेकडून आपल्या शैक्षणिक कर्जाचा व्याजाचा दाखला किंवा स्टेटमेंट मागून घ्यावे आणि आपण भरलेल्या व्याजाची संपूर्ण सवलत घ्यायला विसरू नये. शिक्षण महाग झाले असले तरी शैक्षणिक कर्ज घेऊन त्यावर भरलेले व्याज तुम्हाला देय प्राप्तिकरातून कलम 80-ईच्या रूपात बरीच सवलत देऊन जाते.म्हणून आता उच्चशिक्षण घेण्यात मागे-पुढे पाहू नका.