आर्थिक स्वातंत्र्य
ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार पैशांच्या बाबतीत विचार करणे थांबवून जीवनाचा मनमुराद आनंद उपभोगू याचा आत्मविश्वास वाटू लागल्यावर अनुभवू शकतो.

आर्थिक स्वातंत्र्य फक्त नोकरी, व्यवसाय, स्वरोजगारामुळे येणाऱ्या उत्पन्नामुळे मिळत नाही. असे उत्पन्न तुमचे दैनंदिन जीवन जगण्याचे साधन असते परंतु बराचवेळ आपण ही मिळकत सुरु झाल्यावर  आर्थिक स्वतंत्र झालो अशी समज करून घेतो . ही समजूतच मुळी चुकीची आहे. जो पर्यंत आपण अशा मिळकतीवर आपले दैनंदिन जीवन जगणे अवलूंबून ठेवतो तो पर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य पासून दूर असतो.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाचे असे प्रकारे नियोजन करणे की  या वैयक्तिक आर्थिक नियोजनामुळे सध्याच्या मासिक उत्पन्नाच्या स्तोत्रांवर आपले अवलंबन कमी होत जाईल आणि तरी आपण मनोसोक्तपणे आपले आयुष्य कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय जगू शकू.

आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काय आवश्यक आहे?

आर्थिक स्वातंत्र्यासाठी सोप्या गोष्टी कराव्या लागतात परंतु काहीवेळा आपल्यापैकी अनेकांसाठी तेवढेही करणे तसेच ते देखील दीर्घ काळासाठी अनुसरणे कठीण असते .

या लेखात मी आमचा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास शेअर करत आहे.. तुम्हीही या गोष्टी केल्या तर पुढच्या १० वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात तुम्ही चांगल्या प्रकारे वाटचाल केलेली असेल यात शंका नाही !

1.मी माझ्या पहिल्या पगारापासूनच बचत करायला सुरुवात केली.

2.माझा बचत दर नेहमीच 40 % पेक्षा जास्त होता आणि आजही आहे.

3. EMI आम्ही नेहमी आमच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या २५% च्या खाली ठेवला आहे !

4.आमची गुंतवणूक नेहमीच साधी ठेवत आलो आहोत . जी आर्थिक गुंतवणुकीची साधने आम्हाला कळतात त्याच साधनामध्ये आमची गुंतवणूक असते.

आमच्याकडे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आम्ही EPF, PPF, NPS, इक्विटी MF आणि डायरेक्ट स्टॉक्स मध्ये गुंतवणक आहे !
तसेच आपत्कालीन निधी आणि अल्पकालीन उद्दिष्टांसाठी आम्ही आर्बिट्रेज फंड आणि लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि काही मुदत ठेवीही केलेल्या आहेत.

5. आमच्याकडे मुदत विमा ,आरोग्य विमा आणि अपघात विमा योजना आहेत.

7. आम्ही नेहमी दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर लक्ष केंद्रित करत असतो.

8. सुरुवातीपासूनच आम्ही भाडे, लाभांश आणि व्याज या पासून निष्क्रिय उत्पन्न (passive income ) प्रवाह तयार केला आहे !

9. आम्ही आमच्या उज्वल भविष्यासाठी, चिंतामुक्त सेवानिवृत्तीच्या काळासाठी  आमचे निष्क्रिय उत्पन्न पुन्हा नियमितपणे गुंतवत असतो !

10. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही नेहमीच प्रथम बचत आणि नंतर खर्च या नियमानुसार वागत आलो आहोत.

लहानपणापासून नेहमीच अंथरूण पाहून पाय पसरावे या उक्तीनुसारच आयुष्य जगावे याचे बाळकडू मिळाले असल्याने आमच्याकडून अवास्तव खर्च केला जात नाही !
आणि यापायीच आज कोठेही योग्य त्या सुविधेने जाणे , उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करणे , तंत्रज्ञानाचा लाभ घेणे आम्हा सर्वाना शक्य झाले आहे !

आपणही आपली जीवनशैली आवश्यक असेल तर बदलून *परिपूर्ण आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करावी * यासाठी शुभेच्छा !

अभिप्राय द्या!