लवकर निघा – सुरक्षित पोहोचा ——
गेल्याच आठवड्यात म्युच्युअल फंड संदर्भात एका कार्यशाळेत भाग घेण्याचा योग आला. कार्यशाळेत भाग घेतल्याने आपल्याला माहिती असलेल्या मुद्द्यांपेक्षा काही नवीन मुद्दे लक्षात येतात व काही मुद्द्यांकडे कसे पहावे याचा नवीन दृष्टीकोन मिळतो. या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. कार्तिकेयन यांनी SIP लवकरच सुरु केल्याने काय फायदा होऊ शकतो हे चांगल्या पद्धतीने सांगितले.
समीर व सतीश हे दोन वर्गमित्र होते. बारावी झाल्यावर समीर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दाखल झाला व सतीशने पदवीचे शिक्षण पूर्ण करून Finance Managment चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी लागताक्षणी आपल्या उत्पन्नाचा आढावा घेऊन सतीशने वयाच्या २५ व्या वर्षी Retiredment Benfit Pension Plan (सेवानिवृत्ती योजना) या स्कीम मध्ये दरमहा रु. ५००० ची गुंतवणूक सुरु केली व त्याने स्वत: ३० वर्षे नोकरी करून ५५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचे ठरविले होते. दरमहा रु ५००० निवृत्ती वेतन फंडामध्ये ठेवल्याने त्याची निवृत्ती फंडातील एकूण गुंतवणूक दरवर्षी रु. ६०००० याप्रमाणे ३० वर्षात १८ लाख रुपयांची होणार होती व साधारणपणे १२% ते १४% CAGR ने त्याला निवृत्तीच्या वेळी रु. ३ कोटी ५० लक्ष रुपये मिळणार आहेत व आजची त्याची जीवनशैली आहे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीत तो निवृत्ती नंतर जगू शकेल अशी त्याची आर्थिक स्थिती राहील.
पण समीरने नोकरी लागताचक्षणी कर्ज काढून ४ चाकी वाहन घेतले. तसेच आपला दररोजचा खर्च सुद्धा मासिक उत्पन्नापेक्षा थोडासा जास्तच ठेवला. ५ वर्षांनी काही कामानिमित्त या दोघांची भेट झाली व सतीशने त्याला RBPF संदर्भात माहिती दिली हे एकूण समीरने सुद्धा दरमहा रु. ५००० ची SIP सुरु केली आणि त्याने सुद्धा आपली सेवानिवृत्ती वयाच्या ५५ व्या वर्षी घ्यायचे ठरवून टाकले. पण सेवानिवृत्तीसाठी त्याची जमा होणारी एकूण पुंजी ही सतीशपेक्षा दीड कोटी रुपयांनी कमी होती याचे कारण त्याने ५ वर्षे मौजमजेसाठी स्वत:च्या पगारातील पैसे खर्च केले हे आहे. समीरने दरमहा रु ५००० प्रमाणे २५ वर्षे निवृत्ती वेतन फंडात गुंतवलेली एकूण रक्कम रु. १५ लाख होती. सतीशपेक्षा ही रक्कम ३ लाख रुपयांनी कमी असली तरी एकूण मुदतीत मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा परिणाम हा त्याची निवृत्ती वेतनाची एकूण पुंजी दीड कोटी रुपयांनी कमी होण्यात झाला आहे. म्हणून म्हणतो,
लवकर निघा..
सावकाश जा..
व
सुरक्षित पोहोचा..
ही महामार्गावरील असलेली पाटी अर्थनियोजानात सुद्धा महत्वाची आहे हे निश्चित!