सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती.
ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाटय़ाने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते.
देशपांडेयांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका न व्हाव्यात यासाठी काय करता येईल?
निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही.
कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे करता यावर तुमचे निवृत्तीपश्चातचे जीवन कसे घालवू शकतो हे ठरत असते. आपल्या कमाईच्या वर्षांमध्ये सेवानिवृत्तीचा निधी जितका जास्त असेल तितके आपले निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सोपे, समाधानी होऊ शकते.
निवृत्तीसाठी योजना लवकर सुरू करा
वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमच्याकडे कमावत्या ३५ वर्षांची कारकीर्द असते. वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे, भारतातील सरासरी आयुर्मानात वाढ होत आहे. तुम्ही वयाच्या ९० वर्षांपर्यंत जगाल असे समजून तुमचे नियोजन असायला हवे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सेवानिवृत्त नंतरच्या आयुष्याच्या ३० वर्षांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे तुमच्या घरखर्चात महागाईमुळे वाढ होईल.
वयाच्या ४० व्या वर्षी तुमचा घरखर्च १ लाख रुपये असल्यास, तोच खर्च वयाच्या ६० व्या वर्षी २.६५ लाख रुपयांच्या घरात गेलेला असेल. वयाच्या ८० व्या वर्षी तो४ लाख रुपये तर वयाच्या ९० व्या वर्षी ८लाख रुपये झालेला असेल. थोडक्यात, महागाईमुळे खर्च ५० वर्षांत ७पटींनी वाढण्याची शक्यता आहे. ही संख्या अविश्वनीय वाटू शकेल परंतु हे सत्य आहे.
म्हणूनच कमावत्या वयात सेवानिवृत्तीसाठी मोठय़ा निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
म्युच्युअल फंड हे ‘एसआयपी’द्वारे जमा करण्यासाठी अधिक ओळखले जातात, परंतु ते ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन्स (एसडब्ल्यूपी)’द्वारे नियमित उत्पन्न मिळविण्याचे एक साधन ठरू शकतात. ‘एसडब्ल्यूपी’देखील निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांपेक्षा अधिक कर कार्यक्षम असतात. पारंपरिक ठेवींवरील व्याज उत्पन्न हे ‘एसडब्ल्यूपी’पेक्षा कमी कर कार्यक्षम आहे.
आणि यासाठी तज्ञ सल्लागारच आपली मदत करू शकतो हेही महत्वाचे आहे !!