NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना
गेल्या दोन वर्षातील कोरोना कालावधीतील “वर्क फ्रॉम होम” या परिस्तिथीमुळे *आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नियोजन * यांमध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये बराच फरक पडलेला जाणऊन येत आहे. “वर्क फॉर्म होममुळे” मेट्रो सिटीमध्ये अनेकजण आपल्या क वर्ग किवा ब वर्ग शहरातील घरातून काम करत आहे.

मुलांची शाळा, कॉलेज हे सुद्धा घरातून चालू होते . आणि दुर्दैवाने कुटुंबातील एखादा सदस्य विलगीकरणात राहावयाचा झाल्यास या सर्वांना आपल्या घरातील स्पेसचे नियोजन करणे थोडेफार कठिण झाले होते .

या नियोजनाबरोबर आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झालेले जाणवत आहे. आणि नव्याने नोकरीतील तरुण असो किंवा आयुष्याच्या पन्नाशीला झुकलेली मंडळी असो या सर्वांनाच आपल्या निवृत्ती नंतरच्या जीवनमानासंबंधी विचार करण्याचे सुचत आहे. ही एकाअर्थी चांगली गोष्ट आहे.
निवृत्ती नियोजनामध्ये सध्याची जीवन पद्धती त्यावरील महागाईवाढ आणि संबंधित सर्व खर्च लक्षात घेता सध्या आहे तीच जीवनशैली सुरू ठेवण्यासाठी एक ते दोन कोटी पर्यंत कॉरपस निवृत्तीसाठी लागू शकतो हे सर्व सामान्य माणसाच्या ध्यानी येऊ लागले आहे.आणि या दृष्टीनेच अनेक म्युच्युअल फंड हाउसकडून वेगवेगळ्या नावाने कर बचत साधणा-या पेन्शन स्कीम बाजारात दिसत असून LIC सारख्या अनेक कंपन्यानी जीवन शांती, जीवन आनंद असेही प्लँन बाजारात आणले आहेत.

पण हे सर्व प्लँन पाहत असताना केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला *NPS हा अत्यंत सुंदर व कमी खर्चाचा सोपा * असा निवृतीनियोजन संदर्भातला प्लॅन आहे. यालाच *राष्ट्रीय पेन्शन योजना * असे म्हटले जाते. १८ ते ६५ या वयोगटातील कोणतीही व्यक्ती या अंतर्गत आपले खाते उघडून PRAN क्रमांक प्राप्त करू शकतात आणि आपल्या निवृत्त नियोजनाची गुंतवणूक याद्वारे सुरू करू शकतात.
हे खाते उघडायला किमान रु.५००/- आवश्यक असून त्यापुढे आपण दरवर्षी कितीही रक्कम या खात्यामध्ये गुंतवू शकतो. गेल्या वर्षभरापासून यामध्ये दरवर्षी किमान ६०००/-रु. भरणे बंधनकारक केले आहे. आपण गुंतवलेली सर्व रक्कम पेन्शन फंड ऍथॉरिटी कडून G.Sec. bond कार्पोरेट डीपॉझिट आणि इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणा-याच्या वयोमानानुसार गुंतविली जाते.
रु.५०,०००/- पर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तीकराच्या अतिरिक्त सवलती प्राप्त आहेत. वयाच्या ६५ नंतर या निधीतून आपल्याला एकत्र रक्कम घेणे किंवा पेन्शन सुरू करणे यासंबधीचे पर्याय विचारले जतात. आणि त्यानुसार आपली रक्कम आपल्याला प्राप्त होण्यास सुरवात होते.या प्राप्त रकमेला सुद्धा टॅक्स बेनिफिट्स आहेत.
आपण नोकरी बदलली किंवा व्यवसाय बदलला तरीसुद्धा आपला PRAN बदलण्याची आवश्यकता नसते. आपण ६५ वयानंतर सुरू केलेली पेन्शन आपल्या मृत्यूपश्चात नॉमिनीला सुद्धा सुरू राहू शकते आणि तदनंतर मूळ रक्कम आपल्या मुलांना मिळण्याची सोय आहे.अत्यंत अडचणीच्या वेळी आपल्याला आपण भरलेल्या रकमेच्या काही रक्कम काढण्याचा अधिकार आहे.
यामध्ये यंत्रणेवर होणारा खर्च हा अत्यल्प असल्याने आपल्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळत असल्याने NPS योजना ही अत्यंत चांगली परतावा देणारी योजना आहे. इतर सर्व कंपन्यांच्या पेन्शन योजना ह्या अधिक खर्चिक योजना असून प्रत्येक मिळवत्या व्यक्तीने या योजनेद्वारे आपले भवितव्य सुरक्षित करणे योग्य होईल असे माझे मत आहे.
या योजनेत TIER 1 आणि TIER 2 असे गुंतवणूकीसाठी २ मार्ग उपलब्ध असून TIER 2 मधील गुंतवणुक आपण केव्हाही बाहेर कढून वापरू शकतो. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण कार्यबाहुल्यामुळे वेळ देणे शक्य नसेल त्या सर्वांनी TIER 2 पर्याय घेऊन आपल्या गुंतवणूकीतून भरघोस परतावा मिळण्याची संधी या योजनेद्वारे घ्यावी असे या लेखाच्या शेवटी सांगावेसे वाटत आहे.
TIER 1 आणि TIER 2 याद्वारे केलेली आपली गुंतवणूक ही *सुरक्षित * गुंतवणूक असून आपण याद्वारे आर्थिकदृष्टया सुरक्षितसुद्धा होऊ यात निश्चित शंका नाही !!

अभिप्राय द्या!