आजच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतात. क्रेडिट कार्डाद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेची चिंता न करता पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डेही वापरण्यास सोपी असतात आणि त्याचे अनेक फायदेही असतात. पण लक्षात घ्या की क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची अंतिम तारीख असते, ज्याचे पालन करणे अनिवार्य असते. बिल दिल्यानंतर एका ठराविक तारखेपर्यंत तुम्हाला बिल भरावे लागेल. मात्र, अंतिम मुदत चुकल्यास आपल्याला दंड भरावा लागतो तसेच तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होण्याचा धोका आहे.
अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरायला विसरतात. अशा स्थितीत त्यांचा क्रेडिट स्कोर खराब होतो. मात्र, देय तारखेनंतरही तुम्हाला दंडाशिवाय क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सुविधा उपलब्ध असून तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया.
नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड धारक देय तारखेनंतरही तीन दिवसांपर्यंत दंड न भरता क्रेडिट कार्ड बिल भरू शकतो. म्हणजे जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरण्यास विसरलात किंवा कोणत्या कारणास्तव तुम्ही बिल भरण्यास अपयशी ठरला तर पुढील तीन दिवसांत अतिरिक्त पैसे न भरता तुम्ही बिल भरू शकता.
मात्र, जर तुम्ही देय तारखेच्या तीन दिवसानंतरही क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्याकडून दंड आकारेल. दरम्यान, दंडाची रक्कम तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलावर अवलंबून असते. जर तुमचे बिल जास्त असेल तर तुम्हाला जास्त दंड भरावा लागेल आणि जर ते कमी असेल तर त्यानुसार कमी दंडाने तुमचे काम होईल. उदाहरणार्थ, स्टेट बँक ५०० ते १००० रुपयांच्या बिलावर ४०० रुपये दंड आकारते. तर १००० ते १०,००० रुपयांच्या बिलावर ७५० रुपये आणि १०,००० ते २५,००० रुपयांच्या बिलासाठी ९५० रुपये दंड आकारला जातो.