भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने एमएएस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि भारत रोड नेटवर्क्सला प्राथमिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) मंजुरी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चदरम्यान सेबीकडे अर्ज(डीआरएचपी) सादर केले होते.
बिगर बँकिंग वित्तीय कंपनी एमएएस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रारंभिक विक्रीतून 550 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. या योजनेअंतर्गत कंपनी 307.4 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार असून, विद्यमान भागधारकांच्या सुमारे 242.6 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री करणार आहे.
श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सचा उपक्रम ‘भारत रोड नेटवर्क लि.,’ प्राथमिक समभाग विक्रीदरम्यान 29.30 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे. लवकरच आयपीओसाठी किंमतपट्टा निश्चित केला जाणार आहे.