भारतातील बहुतेक कुटुंबांकडे सोन्याचे दागिने आहेत. अनेक जण सोन्याला संकट काळातील साथीदार मानतात. परंतु आताची बातमी ज्यांच्या घरात हॉलमार्क नसलेले केडीएम किंवा इतर सोने आहे, त्यांच्यासाठी फार चांगली नाही.

घरात पडून असलेले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड झालं आहे किंवा नवीन दागिन्यांसह त्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही खटपट करावी लागणार आहे. सरकारच्या हॉलमार्किंग नियमाच्या अंमलबजावणीमुळे हे संकट उद्भवले आहे. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. याबरोबरच सोन्याच्या दागिन्यांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा लोगो आणि शुद्धता चिन्ह (जसे की 22K किंवा 18K लागू) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवणुकीपासून दिलासा मिळणार असून, खरेदीवर शुद्ध सोने मिळणार आहे. मात्र, याबरोबरच संकटही निर्माण झाले आहे. खरे तर आता हॉलमार्क नसलेले दागिने घरात पडून असल्यास ते विकणं अवघड झालं आहे. तसेच नवीन दागिने घेताना जुन्या दागिण्यांची देवाणघेवाणही करता येणंही मुश्कील आहे.

विक्री किंवा देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे आवश्यक

BIS नुसार, ज्या ग्राहकांकडे सोन्याचे दागिने अनहॉलमार्क आहेत, त्यांनी ते विकण्यापूर्वी किंवा नवीन दागिन्यांसह देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत लोकांसमोर दोन पर्याय असतील. पहिल्यांदा तुमचे दागिने बीआयएस नोंदणीकृत असलेल्या ज्वेलर्सकडे घेऊन जा. बीआयएस नोंदणीकृत ज्वेलरी हॉलमार्क न केलेले सोन्याचे दागिने बीआयएस मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्राकडे हॉलमार्क करण्यासाठी घेऊन जाईल. तेथे दागिन्यांवर हॉलमार्क करून देईल. मात्र, यासाठी ग्राहकाला प्रति वस्तू ४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.

हॉलमार्किंग सेंटरमध्ये वैयक्तिकरीत्या नेण्याचा पर्याय

तुमच्या घरी हॉलमार्क नसलेले दागिने असल्यास तुमच्याकडे ते कोणत्याही BIS मान्यताप्राप्त मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रात नेण्याचा आणि हॉलमार्क करून घेण्याचा दुसरा पर्याय आहे. येथे तुम्हाला प्रति वस्तू ४५ रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर चारपेक्षा जास्त दागिने ठेवल्यास २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. BIS ने जुने आणि हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने तपासण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. BIS या मान्यताप्राप्त मूल्यांकन अँड हॉलमार्किंग केंद्राने जारी केलेला नियम हे दागिन्यांच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. ग्राहक याच नियमाद्वारे कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांकडे त्याचे जुने अनहॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी घेऊन जाऊ शकतात. यानंतर ते सहजपणे त्यांची विक्री किंवा देवाणघेवाण करू शकतात.

अभिप्राय द्या!