जगभरामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये सर्वात प्राचीन, सर्वात विश्वासार्ह आणि तात्काळ रोख उपलब्ध करून देणारा प्रकार म्हणजेच सोन्यामधील गुंतवणूक. या गुंतवणूक प्रकाराविषयी सर्वात आधी जागृत असणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. अनादी काळापासून आपण धनसंचय कुठल्या प्रकारामध्ये करायचा तर तो केवळ सोन्यामध्ये अशी आपली परंपरा राहिली आहे. या परंपरेमुळेच जगभरामध्ये सर्वाधिक सोनं कुणाकडे असेल तर ते भारतीयांकडे आहे. यामुळेच दरवर्षी भारतामध्ये जवळपास ८०० ते ९०० टन सोन्याची खरेदी केली जाते ज्याची किंमत तीन लाख कोटी रुपये आहे.

सोने देशात आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर ते तिजोरी बंद केले जाते. त्याचा व्यापाराच्या दृष्टीने उपयोग होत नाही. एवढी मोठी रक्कम तिजोरी बंद झाल्यामुळे भारताच्या उलाढालीमध्ये तेवढी तूट कायम राहते. कारण ही रक्कम तिजोरी बंद झाल्यामुळे दैनंदिन वापरामध्ये येत नाही आणि तिचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. या उलट झालाच तर तो तोटा होतो.

उपाय ‘डिजिटल गोल्ड’चा

आज तुमच्याकडे पडून असणारे सोने जर तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये परावर्तित केले, तर तुम्हाला विविध फायदे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला हवे तेवढे म्हणजे केवळ पन्नास रुपयांचं सुद्धा सोने तुम्ही डिजिटली खरेदी करू शकता. त्यामुळे काय अगदी महिन्याला हजार- पाचशे रुपयांचे सोने सुद्धा आपण खरेदी करू शकतो. ते डिजिटल स्वरूपात असल्याकारणाने प्रत्यक्षात सोने हाताळण्याची गरज पडणार नाही. डिजिटल हे तुमच्या डिमॅटमध्ये किंवा वॉलेटमध्ये जमा राहील, त्याचे मूल्य जरूर वाढेल शिवाय काही प्रकारांमध्ये त्यावर व्याज सुद्धा मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सोन सांभाळण्याची गरज पडणार नाही, चोरी होणार नाही, किंवा हरवणार नाही. शिवाय जेव्हा हवे तेव्हा या डिजिटल सोन्याला विकून तात्काळ रक्कम उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर कुठल्याही प्रकारची झळ बसणार नाही!!

अभिप्राय द्या!