कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यासाठी आपण रोख रक्कम, चेक/डीडी, डेबिट/क्रेडिट कार्ड व नेट बॅंकिंग या पर्यायांचा अवलंब करीत असतो. गेल्या एक-दोन वर्षांपासून काहीजण पेटीम, मोबिविक, चिल्लर, फ्रीचार्ज यांसारख्या ई-व्हॅलेटचाही वापर करू लागले आहेत. यातील रोख रक्कम व चेक/डीडी सोडून सर्व प्रकारचे पेमेंट “ई-पेमेंट’ म्हणून ओळखले जाते. पण अशा प्रकारचे ई-पेमेंट करण्याबाबत बहुतेकांच्या मनात भीती असते. आपले पैसे नको त्या व्यक्तीच्या खात्यात तर जमा होणार नाहीत ना, माझ्या बॅंक खात्याचा तपशील (बॅंक, खाते क्रमांक, पासवर्ड) इतरांना समजल्यास खात्यातील रक्कम परस्पर काढली जाईल का, अशा शंकांमुळे आजही बहुतांश लोक रोख रक्कम, चेक/डीडीचाच वापर करीत असल्याचे दिसून येते. तथापि, काळ्या पैशाच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचे असेल तर जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार ‘ई-पेमेंट’ पद्धतीने होणे जरुरीचे आहे व त्यासाठी ‘ई-पेमेंट’विषयीची भीती नाहीशी होणे आवश्‍यक आहे. याच उद्देशाने रिझर्व्ह बॅंकेने ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) ही पेमेंट प्रणाली नुकतीच कार्यान्वित केली आहे.

‘यूपीआय’ सुविधेमुळे सर्व प्रकारचे पेमेंट सहजगत्या व तत्काळ होऊ शकेल व सध्याच्या पेमेंट सिस्टिममध्ये क्रांतिकारी बदल होतील. या पद्धतीचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो-
1) या सुविधेसाठी बॅंकेत आपले खाते असणे आवश्‍यक आहे; शिवाय आपल्याकडे स्मार्ट फोन असावा लागतो. आपल्या स्मार्ट फोनवर “यूपीआय ऍप’ डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर आपले बॅंक खाते या ऍपला जोडावे लागते. 2) आपला एक युनिक आयडी (व्हर्च्युअल ऍड्रेस), उदा : विनयचे खाते आयडीबीआय बॅंकेत असेल तर तो आपला व्हर्च्युअल ऍड्रेस vinay@idbi.com असा करेल. 3) मोबाईल “पिन’ निर्माण करावा लागतो. 4) आपले आधार कार्ड “लिंक’ करावे लागते.
या पद्धतीने पेमेंट करताना लाभार्थीचे नाव, बॅंक, खाते क्रमांक व आयएफएस कोड याची गरज नसते, कारण आधार कार्ड “लिंक’ असल्याने या तपशिलाची आवश्‍यकता नसते.
आता नेमके पेमेंट कसे होते, ते पाहूया.

विनयने “बुक माय शो’ या पोर्टलवर “सिटी प्राइड, कोथरूड’ची “बाहुबली ‘ या  चित्रपटाची रु. 200 ची पाच तिकिटे “बुक’ केली व त्याला आता “पेमेंट’ करावयाचे असेल, तर तो नेट बॅंकिग, क्रेडिट/डेबिट कार्ड, पेटीम किंवा तत्सम पर्याय न निवडता, त्याच्या मोबाईलवर “यूपीआय ऍप’ असल्याने त्याचा वापर करू शकेल. हा पर्याय निवडून आपला युनिक आयडी vinay@idbi.com एंटर करेल व लगेचच त्याला रु. 1000 ची देय रक्कम दर्शविली जाईल. आपला मोबाईल “पिन’ टाकून पेमेंटबाबत तो अनुमती देईल व लगेचच ज्या बॅंक खात्यास युनिक आयडी जोडला गेला आहे, त्या खात्यास रक्कम नावे पडून लाभार्थीच्या खात्यात ती जमा होईल. अशा प्रकारे एका वेळी रु. एक लाखापर्यंतची रक्कम “ट्रान्स्फर’ करता येते व ही सुविधा अव्याहतपणे उपलब्ध असते. सध्या 19 बॅंकांनी ही सुविधा देऊ केली आहे. नजीकच्या भविष्यात उर्वरित बॅंकाही ही सेवा उपलब्ध करून देतील. आधार कार्डाशी “लिंक’ असल्यामुळे पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, संबंधित खात्यातूनच “पेमेंट’ होत असल्याने अफरातफर अथवा फसवणूक होण्याचा धोका नाही. त्यामुळे ही “युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) पद्धती समजून घेऊन लवकरात लवकर व जास्तीत जास्त वापरणे हे आपल्याच हिताचेच आहे.

याची विस्तृत माहिती देण्यासाठी  चंद्रशेखर  ठाकुर यांनी सावंतवाडी येथे येण्याचे कबूलही केले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu