आपल्यापैकी बऱ्याच जणांवर लहानपणापासूनच बचतीचे संस्कार घडत असतात.
आपल्याला मिळालेले पिगी बँक असो आई वडील, आजी आजोबा, यांची चर्चा पैशांची देवाणघेवाण आईचे पैसे वाचवण्याच्या तसेच त्या ठेवण्याच्या कृप्त्या, घरातल्या मोठ्या लोकांच्या चालणाऱ्या वेगवेगळ्या भिश्या आदी बाबी पैसे बचतीचेच पूर्वीपासून चालत आलेले संस्कार आहेत.
आणि यातूनच आपल्यावर आर्थिक साक्षरता हा विषय डोक्यात सुरूहोऊ लागतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक साक्षरता या विषयाची उजळणी मात्र कायमच करावी लागते. त्या दृष्टीने काही साधे सोपे मार्ग मी आज आपल्याला सांगणार आहे. हे मार्ग बचतीविषयी मार्गदर्शन करणारे असले तरी बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत आणि त्यातून आर्थिक समृद्धीकडे जाणे यालाच अर्थसाक्षर होणे असे समजले जाऊ शकते. तर चला आपण हे नवे मार्ग पाहूया.
- मोठेपणा टाळा- आपण जसे आहोत तसेच वागलो आणि उगाचच दिखावा टाळला की आयुष्य खूप हलके आणि शांत होते. शक्य होईल त्यापेक्षा कमी खर्च करायला शिकणे महत्त्वाचे आहे. साधेपणात सुख असतेच पण खर्चही कमी असतो हे महत्त्वाचे आहे.
- जमाखर्च मांडा- दिवसभराचा जमा खर्च लिहायला फक्त पाच दहा मिनिटे लागतात. परंतु त्यामुळे आयुष्याचे संपूर्ण गणित कायम हिशोबात राहते. जमाखर्च लिहिल्याने आपोआप क्रेडिबिलिटी वाढते आणि याचे रूपांतर गुडविल मध्ये होते.
- इतरांशी तुलना बंद करा- तुलना इर्षा आणि सततच्या चर्चा यापेक्षा आत्मचिंतन करून तुलना टाळणे बंद करणे हिताचे आहे.
- एखादी गोष्ट किंवा वस्तू बिघडली की टाकून देण्यापेक्षा ती दुरुस्त होते का पाहणे हे खूप महत्त्वाचे असते यामुळे खर्च कमी होऊन बचतही होते हे वेगळेच.
- गरज असेल तरच नवी खरेदी करा- गरजा कमी केल्या की पैसा वाचतो आणि आनंद वाढतो. घर असो गाडी असो किंवा एखादी नवी वस्तू असो पूर्ण हिशोब करून त्याची खरेदी व्हायला हवी. खरेदीमुळे होणारा फायदा आणि उपयोग या सर्वांचा सुरुवातीलाच विचार होणे खूप महत्त्वाचे आहे.
- वाटाघाटीत तरबेज व्हा– वाटाघाटींचे कौशल्य नीट शिकता आले पाहिजे. ऑनलाइन युगात समोर समोरचे बार्गेनिंग कमी होते. खऱ्या आयुष्यात मात्र ते खूप गरजेचे असते. आताच्या तरुण पिढीने ते करणे नीट आत्मसात केले पाहिजे. यामुळे आर्थिक शिस्त लागते व कमी खर्चात एखादी वस्तू घेणे जमू शकते.
- घरचाच आहार जेवण पाणी प्या- सतत बाहेरचे जेवण, चटपटीत खाण्याच्या सवयी यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. शक्य असेल तेव्हा घरून डबा घेऊन बाहेर पडलो तर वायफळ खर्च कमी होतो. पाणी सुद्धा आहे गरज लागली की बाहेरून खरेदी करण्यापेक्षा स्वतः बरोबर घेऊन गेले तर निश्चितच 25 ते 30 रुपये वाचू शकतात.
- सुपर मार्केटमध्ये यादी करूनच खरेदी करा- यादी करून खरेदी करण्याची सवय खूप चांगली.त्यात वेळ पण वाचतो आणि खरेदी ही कमी खर्चात होते. जे लोक सुगीच्या दिवसात खरेदी करतात ते लोक नंतर आपण खरेदीत खूप पैसा घालवला याचा पश्चात्तापाही करतात म्हणून यादी करून खरेदी करणे खूप फायद्याचे ठरते.
- प्रत्येक बिल किंवा हिशोब तपासून घ्या- भावनेच्या भरात असताना हिशोब पाहणे अजिबात चुकवू नये. त्याचवेळी आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते.पैसे देताना बिल तपासणी करूनच देणे हे योग्य ठरते. यामुळे चांगली शिस्त लागते शिवाय समोरील व्यक्तीही आपल्या सोबत भविष्यात व्यवहार करताना अधिक काळजी घेते.
- आणि या सर्व सवयीपायी, आपण केलेली बचत आपल्याला खरा आत्मविश्वास देते , त्याद्वारे गुंतवणूक आणि पैशांचा गुणाकार सुरू होतो आणि आपण खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण तर बनतो शिवाय आपल्या वागण्या बोलण्यातून त्याची जाणीव सर्वांनाच होत जाते.
- म्हणून वरील सवयी अमलात आणून सर्वांनी बचत करण्या शिकावे आणि बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करून आपल्या संपत्तीचे नियोजन योग्यरीत्या करण्यास शिकणे खूप हिताचे आहे.
- प्रदीप जोशी 9422429103