एकोणतीस वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली की, त्या घटनेचे काय परिणाम होणार हे बाजारात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या बाजाराशी संबंधित असलेल्या व्यक्तींनादेखील कळले नाही. १९९४ ला राष्ट्रीय शेअर बाजाराचा जन्म झाला त्याची ही कूळकथा.

वर्षानुवर्षे मुंबई शेअर बाजाराला स्पर्धा हा शब्दच माहीत नव्हता. प्रादेशिक शेअर बाजार वेगवेगळ्या भागात त्यांच्या मर्यादेत कार्यरत होते. त्या सर्वांना फार तर मुंबई शेअर बाजाराचे उपग्रह म्हणता येईल. १९९२ ला हर्षद मेहताने करून दाखविलेल्या करामतीमुळे सरकार खडबडून जागे झाले. १९८५ ला अर्थसंकल्पात ‘सेबी’ हा शब्द सर्वप्रथम आला. परंतु कायदा अस्तित्वात यायला सात वर्षे लागली. या कायद्यानंतर फेरवानी समितीने नवीन शेअर बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आयडीबीआयचे त्यावेळचे अध्यक्ष एस. एस. नाडकर्णी यांना ती जबाबदारी सोपवली गेली. पण त्यांनी ज्यांची राष्ट्रीय शेअर बाजार निर्माण करण्यासाठी निवड केली ती व्यक्ती होती आर. एच. पाटील.

आर. एच. पाटील यांचा जन्म ५ सप्टेबर १९३७ सालचा. मुंबई विद्यापीठातून एम ए (अर्थशास्त्र) आणि पीएचडी त्यांनी मिळविली. डॉ. आर. एच. पाटील यांना या कामासाठी नाडकर्णी यांनी निवडताना नाट्यपूर्ण घोषणा केली होती. ते म्हणाले, आर. एच. पाटील आपल्या संस्थेला सोडून जात आहेत. सहकाऱ्यांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. पण पुढे नाडकर्णी यांनी स्पष्ट केले – ‘मी त्यांच्यावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवत आहे. ते आता कोणाच्याही हाताखाली काम करणार नाहीत. ते जे काम करणार आहेत त्या कामात ते सर्वेसर्वा असतील. ते अशा संस्थेला जन्म देतील जी संस्था शेअर बाजारातील दलालांचा आवाज बंद करेल. डॉ. पाटील त्यावेळेस फक्त ५५ वर्षांचे होते. परंतु त्यांनी फक्त अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळवलेले असे ते नव्हते तर सर्व अर्थव्यवहारातील बारकावे, संगणकाचा वापर यांचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बेळगावजवळ कर्नाटकमध्ये नांदगड येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी प्रथम धारवाडच्या कर्नाटका कॉलेजमध्ये, त्यानंतर मग पुण्याला फर्गसनमध्ये आणि पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून डॉक्टरेट मिळवली. ते रिझर्व्ह बँकेच्या नोकरीत रुजू झाले. पण लागलीच ते त्यानंतर आयडीबीआयमध्ये आले.आयडीबीआयने जेव्हा त्यांना राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करायला सांगितले, तेव्हा त्यांनी वरळी येथे महिंद्रा टॉवर्स या ठिकाणी छोटेसे कार्यालय सुरू केले. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सहजपणे असे विचारले की, ‘तुमची योग्यता आणि तुमच्यावर असलेली जबाबदारी यासाठी तुम्हाला मोठे कार्यालय, अनेक माणसे हाताखाली असायला हवीत.’ त्यावेळेस पाटील यांनी ताबडतोब उत्तर दिले – ‘कशासाठी? काहीही गरज नाही. मला, फक्त एक टेबल, एक लिखाणासाठी पेन आणि तल्लख मेंदू असलेला साहाय्यक एवढीच फक्त गरज आहे.’

इतक्या कमी साधन सामग्रीवर जगातील तंत्रज्ञानातील उत्कृष्ट बाजार मंच त्यांनी निर्माण केला. त्यांच्या हाताखाली काम केलेल्या रवी नारायण याने अशी खंत व्यक्त केली की, ‘आर. एच. पाटील यांनी शेअर बाजार उत्कृष्टपणे सुरू केला. पण त्यांना राष्ट्रीय शेअर बाजार हा फक्त शेअर्स उलाढालींचे नाही तर ऋणपत्रांच्या बाजारपेठेतसुद्धा जगाच्या बाजारात एक सर्वश्रेष्ठ बाजार व्हायला हवा असे त्यांचे स्वप्न होते.’ १२ एप्रिल २०१२ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यावेळेस ते ७४ वर्षांचे होते. जर ते हयात असते तर राष्ट्रीय शेअर बाजार आणखी वेगाने मोठा झाला असता. या बाजारासंबंधी काही अप्रिय घटना ज्या घडल्या त्या घडल्या नसत्या एवढे नक्की. प्रत्येक संस्था नशीब घेऊन जन्माला येते. १९९० ला भारतीय भांडवल बाजार अश्मयुगात होता. शेअर बाजार दलालांची मक्तेदारी असलेला क्लब होता. नोंदणी असलेल्या कंपन्या, गुंतवणूकदार हे सर्व दलालांच्या हातातील प्यादी होती, आश्चर्य वाटेल परंतु बाजार फक्त दोन तास चालू असायचा आणि वर्षातील फक्त १५० ते २०० दिवस चालू असायचा. आणि या उलट न्यूयार्क स्टॅाक एक्सचेंज, नॅसडॅक तसेच फ्रान्सचा शेअर बाजार असे जगातील अनेक बाजार तंत्रज्ञानात अग्रेसर होते. शिकागो फ्युचर एक्सचेंज या ठिकाणी सेटलमेंट व्यवस्थित होईल याची हमी होती. व्ही-सॅट हा शब्दसुद्धा कोणी ऐकलेला नव्हता. नोव्हेबर १९९४ ला राष्ट्रीय शेअर बाजार जेव्हा सुरू झाला त्यावेळेस सेटलमेंटची गॅरंटी आणि स्वतंत्रपणे व्यवहाराची जुळवणी करण्यासाठी क्लीअरिंग कार्पोरेशन हे सर्व bombay शेअर बाजाराच्या आकलन शक्तिपलीकडचे होते. १९९६ ला डॉ. पाटील यांनी एनएसडीएल या संस्थेची स्थापना केली. सुदैवाने त्यावेळचे सेबीचे अध्यक्ष जी. व्ही. रामकृष्ण हे भक्कमपणे डॉ. पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे मुंबई शेअर बाजारालासुद्धा आपल्या यंत्रणेत बदल करावा लागला तसेच सीडीएसएलची स्थापना करावी लागली

बाजारात सध्या कार्यरत असलेल्या तरुण पिढीला डॉ. आर. एच. पाटील हे नावसुद्धा माहिती नसेल. त्या उप्पर त्यांनी काय महत्त्वाचे काम केले याची माहिती असणे तर अशक्यच. पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात मुलींना उद्देशून असे वाक्य वापरले होते की, ‘तुम्हाला आज शिकता येते याचे श्रेय महात्मा फुले, आगरकर यांना जाते, त्याची आठवण ठेवा.’ अगदी त्याचप्रमाणे झीरोधावर सर्व व्यवहार करणाऱ्या नवगुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी हे सुलभ दालन ज्यांच्यामुळे शक्य बनले त्या डॉ. आर. एच. पाटील यांची आठवण ठेवावी!

अभिप्राय द्या!