भांडवली बाजारात चालू महिन्यात चार कंपन्या सुमारे 5,000 कोटी रुपयांची प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) करण्याची योजना करीत आहेत. यामध्ये दूरसंचार उपकरणे तयार करणारी कंपनी तेजस नेटवर्क्स, डिपॉझिटरी सर्व्हिसेस कंपनी सीडीएसएल, फार्मा कंपनी एरिस लाइफसायन्सेस आणि स्मॉल फायनान्स बँक एयु स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश आहे.

सीडीएसएल
देशात रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा देणारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(सीडीएसएल) प्रारंभिक हिस्साविक्रीतून 400 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. कंपनी एकुण 3.52 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. यापैकी मुंबई शेअर बाजार (बीएसई), स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आपल्या मालकीच्या 3.45 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. ऊर्वरित सात लाख शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

तेजस नेटवर्क्स
दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तेजस नेटवर्क्सचा आयपीओ जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. कंपनीत गोल्डमन सॅक्स, इंटेल कॅपिटल, फ्रंटलाईन स्ट्रॅटेजी अँड मेफिल्डसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची हिस्सेदारी आहे. प्रारंभिक हिस्साविक्री योजनेत कंपनी 450 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, विद्यमान भागधारकांच्या 1.27 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक
एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आयपीओ महिनाअखेर सादर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकेचा परवाना मिळालेल्या कंपन्यांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचादेखील समावेश आहे. एक्विटास आणि उज्जीवननंतर शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी तिसरी स्मॉल फायनान्स बँक असेल.

एयूच्या हिस्साविक्रीमध्ये केवळ ‘ऑफर फॉर सेल’द्वारे शेअरविक्री केली जाणार आहे. यावेळी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वॉरबग पिंकस, ख्रिसकॅपिटल आणि केदारा कॅपिटलचा समावेश आहे.

एरिस लाइफसायन्सेस
एरिस लाइफसायन्सेस या फार्मा कंपनीची प्राथमिक समभाग विक्रीतून दोन हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आहे. प्रस्तावित योजनेत कंपनी सुमारे 28,875,000 शेअर्सची विक्री करणार आहे.

यासंबधी अधिक माहितीसाठी “शेअरखान ” सावंतवाडी या कार्यालयाशी संपर्क साधावा .

अभिप्राय द्या!

Close Menu