परदेशी प्रवासात तुम्ही जिथे जाणार आहात त्या देशात प्रवास विमा सक्तीचा नसला तरी प्रवास विमा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या योग्य ठरते. तुम्हाला सिंगल ट्रिप कव्हर किंवा मल्टि-ट्रिप प्लान यांतून निवड करता येते. तुम्ही अनेकदा परदेशी जात असाल तर तुम्ही मल्टि-ट्रिप प्लान घ्यावा. यामुळे एका वर्षात तुम्ही करणार असलेले सर्व परदेश प्रवास विम्यामध्ये समाविष्ट केले जातील. मात्र, ट्रिपचा जास्तीत जास्त कालावधी योजनेतील पर्यायानुसार ३० दिवसांपर्यंत, 45 दिवसांपर्यंत किंवा 60 दिवसांपर्यंत असतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, विविध कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या विमाकवचाची आणि लागू होण्याच्या प्रीमिअमची तुलना करून बघणे महत्त्वाचे आहे. कुटुंबासहित प्रवास करणार असाल तर कौटुंबीक प्रवास विमा फायदेशीर ठरतो.
तुम्ही घेत असलेल्या विमा योजनेमध्ये कोणकोणत्या घटना समाविष्ट केल्या जातील हे विमा कंपनीला विचारणे आवश्यक आहे. सर्व प्रवास विमा योजनांमध्ये वैद्यकीय आणीबाणीचा (ही आणीबाणी अगोदरपासून असलेल्या आजारांमुळे निर्माण झालेली नसल्यास) समावेश केला जातो. कोणत्या प्रकारच्या बिगर-वैद्यकीय आणीबाणी समाविष्ट केल्या जातील ते माहीत करून घ्यायला हवे. सर्वंकष प्रवास विमा योजनेमध्ये विमानाला विलंब, ट्रिप रद्द होणे, चेक्ड-इन सामान हरवणे, पासपोर्ट गहाळ होणे आर्थिक आणीबाणीच्या वेळी सहकार्य अशा बिगर- वैद्यकीय आणीबाणी समाविष्ट केल्या जातात. तुम्ही सुटीनिमित्त बाहेर असताना तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घराचे व अन्य वस्तूंचेही चोरीपासून संरक्षणक केले जाऊ शकते.
परदेशात असताना तुम्ही कार भाड्याने घेणार असाल व त्याने फिरणार असाल तर प्रवास विमा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण, सर्वंकष प्रवास विमा योजनेमध्ये अपघाताची जोखीम, वैद्यकीय खर्च व यांचाही समावेश केला जातो आणि तुमच्यामुळे अपघाताने थर्ड पार्टीस जखम झाल्यास वा मालमत्तेचे नुकसान झाल्यास ही योजना पर्सनल लाएबिलिटी कव्हरही देते. यापैकी एखादा घटक मूळ योजनेत समविष्ट केलेला नसल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ म्हणून रायडर खरेदी करता येऊ शकतो. यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागले तरी एखादी दुर्दैवी, अनपेक्षित घटना घडली तरी तुमची ट्रिप सुरळीत होण्याची खात्री तुम्हाला मिळते.
सध्या भारतीय रेल्वेने सुद्धा त्यांच्या प्रवासादरम्यान विमा कवच देण्याची सुविधा दिल्याने प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे .