अंधानुकरण करू नये

अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्राचा पुत्र. मात्र तो एकटाच चक्रव्युहात प्रवेश करतो (युद्धभूमीवर तयार करण्यात आलेला मनुष्य—निर्मित भूलभुलैय्या) त्याला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र मात्र अर्धवट अवगत असते. या मागील पार्श्वभूमी अशी की, अभिमन्यू पोटात असताना अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र सांगतो. मात्र त्याचे बोलणे अर्ध्यावर आले असताना सुभद्रेला झोप लागते. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र अर्धवट अवगत होते. त्यामुळेच तो  तग धरू शकत नाही आणि त्याचा मृत्यू ओढवतो.

गुंतवणूक परिघातही गुंतवणूकदारांनी बाजार अस्थिर असताना गांगरून अविचाराने पाऊल उचलू नये. एखाद्या गोष्टीचे अर्धवट ज्ञान चुकीच्या गुंतवणूक निर्णयाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे कठीण होऊ  शकते. एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी योजनेची माहिती नीट वाचावी किंवा आर्थिक सल्लागाराशी  संपर्क करावा.

सुलभता ठेवा; गुंतागुंत करू नका

महाभारतातील शकुनी हा फासे खेळण्यात पटाईत होता. त्याने पांडवाना हस्तिनापुरला बोलावून घेण्याचे कारस्थान रचले आणि त्यांच्याविरुद्ध खेळ जिंकण्यास दुर्योधनाला मदत केली. त्यात युधिष्ठिराचे राज्यच गेले नाही तर तो आपली सर्व मालमत्ता, भाऊ आणि पत्नी गमावून बसला. धृतराष्ट्राने त्यांची संपत्ती सुरक्षित ठेवली; मात्र पांडव पुन्हा दुसरी फेरी हरले आणि त्यांना १३ वर्षांचा वनवास भोगावा लागला.

गुंतवणूक जगतातही हेच तत्त्व लागू होते. एक गुंतवणूकदार म्हणूनसोपा मार्ग पत्करा. कधीही झटपट परतावा किंवा आकर्षक उत्पादनांच्या भूलथापांना बळी पडू नका. कायम चांगल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. पैसे कमी मिळाले तरी चालेल; मात्र सर्वकाही गमावण्यात अर्थ नाही !

या महाभारतातील तत्वानुसार वागून गुंतवणूक केल्यास फायदा आहे हे निश्चित!!

 

 

अभिप्राय द्या!