सध्या शेअर बाजारात तेजीचे वारे जोरात सुटले आहे. पावसात ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी भूछत्र येतात, त्याचप्रमाणे तेजीतील शेअर बाजारात “डायरेक्‍ट’ अथवा “इनडायरेक्‍ट’ पद्धतीने अशी अनेक लोक प्रवेश करतात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त परताव्याच्या आमिषाने फसवतात. जास्त परतावा मिळेल, या आशेने सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याच-त्याच चुका वारंवार करतात व अनेकदा अशी फसवणूक होऊनसुद्धा हेच गुंतवणूकदार दरवेळेस नवनव्या प्रलोभनांना बळी पडताना दिसतात.

शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, असा बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाल्यावर अचानक आपल्याला नित्यनेमाने “एसएमएस’द्वारे अमुक शेअर घ्या, याचा तमुक पटीने भाव वाढेल, कारण मोठ्या लोकांनी, वित्तीय संस्थानी हे शेअर खरेदी केले आहेत, आपणही त्यात मोठी गुंतवणूक करावी, असे “एसएमएस’मध्ये सुचवले गेलेले असते. सामान्य गुंतवणूकदार अशा फसव्या माहितीला बळी पडून आपले मेहनतीचे पैसे यात अडकवतात. कोणतीही माहिती न घेता केलेली ही गुंतवणूक ज्या वेळेस अंगलट येते, तोपर्यंत हा गुंतवणूकदार उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे पाठ करून उभा राहतो. फसवणूक झाल्यावर हाच गुंतवणूकदार आपल्या परिचयाच्या अनेकांना शेअर बाजार हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही, अशी भावना प्रखरपणे रुजवतो.

शेअर बाजारात जोखीम ही कायमच असते. त्यात जर आपण अशा प्रलोभनांना भुललो तर नक्कीच आपली फसवणूक होणार, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज भासू नये. शेअर बाजारात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे या बाजारातील गुंतवणुकीबाबत कोणीही हमी (गॅरेंटी) देऊ शकत नाही. किंबहुना, “गॅरेंटी’ हा शब्द शेअर बाजारातील गुंतवणुकीला लागूच होत नाही. त्यामुळे वाचकांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच कोणी अशा गुंतवणुकीवर “गॅरेंटी’ देत असेल तर लगेच सावध झालेले बरे! कारण सोपे आहे, आपल्याला “गॅरेंटी’ देणारी व्यक्ती स्वतःच पैसे गुंतवून मोठा परतावा मिळवू शकते. ती तुमच्या भल्यासाठी कशासाठी फुकटचा वेळ वाया घालवेल? त्यामुळे वरील नमूद केलेल्या गोष्टींचा योग्य तो बोध घ्यायला हवा.

“डेली ट्रेडिंग करून अमुक टक्के परतावा मिळवा,’ “चिटफंडमध्ये पैसे गुंतवून अमुक टक्के परतावा मिळवा,’ अशा प्रकारच्या प्रलोभनांनाही अजिबात बळी पडू नये. अनेक लोक जाहिरातीद्वारे, एसएमएस व अन्य प्रकारे अशी प्रलोभन दाखवत राहतील. पण आपण सावध असले पाहिजे. शेअर बाजार हा अनेक बाबींवर अवलंबून असतो. त्यात जागतिक घडामोडी, राजकारण, कंपन्यांची उत्पादन व विक्री, नैसर्गिक आपत्ती या व इतर अनेक गोष्टींवर बाजाराची स्थिती अवलंबून असते. त्यामुळे या ठिकाणी गॅरेंटेड अथवा फिक्‍स्ड रिटर्न्स कोणीही देऊ शकत नाही, हे पक्के ध्यानात ठेवावे. बाजारातील तेजी पाहून नव्याने बाजारात प्रवेश केलेल्यांनी तर याबाबत विशेष दक्ष रहायला हवे. आपण बाजारात नवीन असल्यास, थेट शेअर बाजाराऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणुकीस सुरवात करावी व त्यातदेखील अनुभवी व योग्य व्यक्तीकडून सल्ला घेण्यास प्राधान्य देणे योग्य ठरेल.

अभिप्राय द्या!

Close Menu