बऱ्याच जणांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम पडून असते, ती त्यांना इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंडांमध्ये गुंतविण्याची इच्छा असते. मात्र, शेअर बाजाराच्या लहरीपणामुळे आपली रक्कम सुरक्षित राहील अथवा नाही याचा त्यांना भरवसा नसतो. त्यामुळे वित्त सल्लागारांकडून त्यांना ही रक्कम पुढील ६ ते १२ महिन्यांसाठी सिस्टमिॅटिक ट्रान्स्फर योजनेच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात (एसटीपी) गुंतविण्याचा सल्ला दिला जातो.
एसटीपी अंतर्गत गुंतवणूकदारांना एकदाच मोठी रक्कम एखाद्या योजनेत गुंतवण्याची सुविधा म्युच्युअल फंड पुरवते. एसटीपीने गुंतवलेली ही एकगठ्ठा रक्कम दुसऱ्या एखाद्या योजनेत नियमित कालावधीने थोडी थोडी गुंतवली जाते. अशा वेळी मोठी रक्कम गुंतवलेली योजना ही ‘स्रोत योजना’ असते, तर हस्तांतरित रकमेची दुसरी योजना ही ‘लक्ष्य योजना’ होते. एसटीपीचा वापर करून साधारणतः गुंतवणूकदार लिक्विड फंडात मोठी रक्कम एकगठ्ठा गुंतवतात आणि त्यानंतर इक्विटी फंडात ती नियमितपणे थोडी थोडी हस्तांतर करतात. इक्विटी म्युच्युअल फंडांत एकगठ्ठा गुंतवणूक करण्यास बिचकणारे गुंतवणूकदार हा मार्ग अनुसरतात. एसटीपीमुळे तुमच्या गुंतवणुकीचा तोल सांभाळणे शक्य होते.
एसटीपीमध्ये निधी कसा गुंतवावा ?
एखाद्या गुंतवणूकदाराला एक लाख रुपये एसटीपीद्वारे इक्विटी फंडात गुंतायचे असतील, तर प्रथम त्याला एखादा डेट फंड निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर किती रक्कम इक्विटी फंडात हस्तांतर करायची व केव्हा करायची ते ठरवायचे असते. उदाहरणार्थ, गुंतवणूकदार दर महिन्याच्या पहिल्या तारखेस १० हजार रुपये पुढील दहा महिन्यांसाठी हस्तांतर करायचे ठरवू शकतो, किंवा दर आठवड्याला २५०० रुपये हस्तांतर करायचे ठरवू शकतो. अशी हस्तांतर सुविधा दैनंदिन, साप्ताहिक, मासिक व त्रैमासिक कालावधीसाठी उपलब्ध असते.
एसटीपीमध्ये इक्विटी फंडात हस्तांतर होईपर्यंत पैसे लिक्विड फंडातच जमा राहतात. या पैशावर मिळणारा परतावा हा साधारणतः बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे सुरक्षा व लाभ हे दोन्ही मुद्दे लक्षात घेतल्याने फायदा होतो .