शेअर बाजारात या आठवड्यात थोडेफार चढ-उतार झाले असले तरी हा बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी उच्चांकी पातळी गाठली गेली की सर्वसामान्यांमध्ये या बाजाराविषयी आकर्षण वाढू लागते. अशावेळी या बाजारात अनेक गुंतवणूकदार हे नवीन गुंतवणूक करावी की नाही या विवंचनेत दिसतात. परंतु, बाजाराची वाटचाल ही कायम अनिश्चित असते. बाजार खाली येण्याची वाट पाहू आणि मग गुंतवणूक करू, असे म्हणणारे बाजारात पैसे गुंतवू शकलेले नाहीत व दुसरीकडे बाजारानेही नवनवे उच्चांक प्रस्थापित करणे थांबविलेले नाही. त्यामुळे बाजाराचा अंदाज लावण्यात वेळ घालवू नये, हेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
आगामी काळात बाजारात ‘करेक्शन’ अथवा नफेखोरी नक्कीच होऊ शकते, परंतु अशावेळीसुद्धा अनेक कंपन्यांचे शेअर हे गुंतवणुकीची संधी देत असतात. गुंतवणूकदारांनी अशा शेअरवर लक्ष ठेवायला हवे. अशा बाजारात ट्रेडर्स मंडळींनी नक्कीच सावधगिरी बाळगायला हवी, कारण त्यांचा दृष्टिकोन हा अल्प कालावधीचा असतो. तसेच बाजारातील अनेक तथाकथित दिग्गज मंदीची वाट बघत आहेत. पण अशी वाट बघण्यात ही मंडळी “बाजारातील तेजी’ आधीच गमावून बसलेली आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.