सलग 1800 अंशांच्या वाढीनंतर शेअर बाजारात मोठ्या “करेक्‍शन’ची भीती असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारात पुनर्प्रवेशासाठी वाट बघत आहेत. एका बाजूला “शेअरचे भाव महाग झाले आहेत,’ असा सावध पवित्रा घेत सर्वसामान्य गुंतवणूकदार “करेक्‍शन’ची वाट बघत आहेत; तर दुसरीकडे देशी व परदेशी वित्तीय संस्था चढाओढीने बाजारात गुंतवणूक करीत आहेत. सध्याही हा ओघ फार कमी झालेला नाही.
आपला शेअर बाजार महाग झाला आहे, अशी सार्वत्रिक चर्चा चालू आहे. याचे विश्‍लेषण  पाहूया. जानेवारी 2008 मधील आकड्यांशी तुलनात्मक आजची परिस्थिती बघता, 2008 मध्ये “निफ्टी’चा पीई -22 होता; आजचा 24.37 आहे. तेव्हा विकासदर 9.7 होता; आजचा 7.1 आहे. तेव्हा औद्योगिक उत्पादन निर्देशांक 13.7 होता; आज तो 2.7 आहे.  कच्च्या तेलाचा भाव 93 डॉलर प्रतिबॅरल होता, आज तो 50 आहे. यावरून स्पष्ट दिसत आहे, की जानेवारी 2008 च्या तुलनेत आजचा आपला बाजार महाग आहे. यावरून “निफ्टी’त 9150 अंशांपर्यंत “करेक्‍शन’ अपेक्षित आहे; परंतु आजच्या परिस्थितीत लगेच हे घडेल, असे वाटत नाही. पावसाची उत्तम सुरवात आणि दुसरीकडे वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी एक जुलैला होत असल्याने बाजाराला आधार मिळाला आहे; परंतु “योग्य मूल्य’ या निकषांवर बाजारात “करेक्‍शन’ होणारच, यात शंका नाही; पण त्याचे अजूनही स्पष्ट संकेत दिसत नाहीत. 9513 अंशांखाली “निफ्टी’ टिकल्यास ते शक्‍य होऊ शकेल.

अभिप्राय द्या!