वस्तू व सेवा करामुळे(जीएसटी) देशाच्या करप्रणालीत ऐतिहासिक बदल घडून येईल असा दावा आहे. पण याचा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि बायकोबरोबर फिरायला जायचंय ? तर तुमच्या आर्थिक प्लॅनिंगवर जीएसटीचा काय परिणाम होईल हे पहा —
हॉटेलमध्ये जाण्याचा पर्याय जरा खर्चिक ठरु शकतो. कारण, हॉटेल उद्योगातील विविध सेवांसाठी 12 टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू होणार आहे. साध्या हॉटेलसाठी 12 टक्के आणि वातानुकूलीत हॉटेलसाठी तसेच मद्यपरवाना असलेल्या हॉटेलसाठी 18 टक्के जीएसटी लागू होईल. तसेच फाईव्ह-स्टार हॉटेल्ससाठी 28 टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये डिनरला जाण्यापुर्वी जर तुमचा एखाद्या सिनेमाला जाण्याचा विचार असेल मग तर तुमचा खिसा आणखी जास्त रिकामा होऊ शकतो. आता सिनेमा तिकीटांच्या मूळ किंमतीवर 28 टक्के जीएसटी लागणार आहे. परंतु, त्यातला त्यात एक दिलासा म्हणजे तुम्हाला फक्त 100 रुपये तिकीट असणाऱ्या थिएटर्सचा पर्याय आहे. कारण या तिकीटांवर केवळ 18 टक्के जीएसटी लागणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडा जास्त रिसर्च करावा लागेल! त्यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे कॅबचा दर थोडा कमी होणार आहे. सरकारने कॅब सेवांना 5 टक्के दराच्या कक्षेत आणले आहे.
जर तुम्ही थोडं बजेट वाढवून एखादी छोटी सहल प्लॅन करत असाल तर विमानाचा प्रवास शक्य आहे. जीएसटीअंतर्गत विमानाच्या इकॉनॉमिक क्लास तिकीटांसाठीचा दर 5 टक्के करण्यात आला आहे. मात्र, बिझनेस क्लास तिकीटांवर 12 टक्के जीएसटी लागणार आहे. दररोज एक ते अडीच हजार भाडे असणाऱ्या हॉटेलसाठी 12 टक्के, अडीच ते पाच हजार भाडे असणाऱ्या हॉटेलसाठी 18 टक्के आणि पाच हजारांहून अधिक भाडे आकारणाऱ्या हॉटेलवर 28 टक्क्यांच्या जीएसटी निश्चित करण्यात आला आहे.