‘मी गेले होते गं त्या एजंटाकडे. पण काय ते बाबा ओपन आणि क्लोज एन्डेड आणि तुमचा तो  डिव्हीडंड का ग्रोथ मॉडेल आणि अस काय काय बोलायला लागला तो.

मला तर अजिबात कळलं नाही. एफडीच बरी बाबा आपली!’ – स्मिता दडपूनच गेली होती.

‘अगं थांब गं तू आत्या जरा…!’ – सविता हसत हसत म्हणाली. ‘सगळं समजेल. आपल्याला आपल्याच पैशाच्या गोष्टीनं घाबरायला का होतं ते समजत नाही. मोठ्या मोठ्या इंग्रजी गोष्टी बोलल्या का उगीच घाबरून जायला होतं एवढं काही कठीण नाहीये त्यात!’

‘अग तसं नाही, तो एजंट गेल्या गेल्या म्हणे, डेट हवा का इक्विटी? आता उत्तर देण्याआधी त्याचा प्रश्न तर मला समजायला हवा ना!’

‘हं. मी सांगते सगळं तुला. मी म्हटलं नव्हतं का गेल्या वेळेला आधी थोडं समजून घ्या आणि मग लागा कामाला. आता मला सांग, आठवतंय का मी सांगितलं होतं की अनेक लोकं आपला कमीअधिक पैसा एखाद्या मोठी कंपनीनं सुरु केलेल्या गंगाजळीत ओततात ते?’

‘हो मग, आणि तो फंड मॅनेजर ते पैसे आपल्यासाठी गुंतवतो.’

‘बरोब्बर!’ पण आपल्याकडून गोळा करताना त्याला सांगावं लागतं की हा पैसा साधारणपणे कुठे गुंतवला जाणार ते. या असतात वेगवेगळ्या फंड योजना. मग कोणत्याही योजनेनिमित्त गोळा केलेला पैसा हा आधी सांगितल्यानुसारच गुंतवावा लागतो.’

‘आधीच ठरवायचं कुठे गुंतवणार ते?’

‘अगं म्हणजे असं की कोणत्या प्रकारची गुंतवणूक फंड मॅनेजर करणार आहे. उदा. कंपनीच्या हिस्स्यात अर्थात शेअर्समध्ये गुंतवणार की कंपनीला कर्ज देणार आपल्या पैशातून? यालाच म्हणतात इक्विटी किंवा डेट.’

‘हो. पण एवढंच नाही, अजून बरेच प्रकार आहेत कुठे गुंतवायचे ते ठरवताना. ‘पण हे एवढे प्रकार कशासाठी?’

‘अगं असं आहे आत्या, शेवटी आपण आपले पैसे दुसऱ्याच्या हातात देतो कारण त्यातून भरपूर नफा व्हावा असं आपल्याला वाटतं. पण त्याच वेळेला ज्याला दिलेला आहे तो त्या पैशाचा नीट वापर करू शकणार नाही किंवा आपल्याला फसवेल हा धोकाही आहेच ना त्यात? तेव्हा आपल्याला माहीत हवं की सर्वसाधारणपणे आपल्या पैशावर कोणता धोका पत्करला जातोय ते? कोणत्या क्षेत्रात तो गुंतवला जातोय? आणि त्यानुसार आपण पैसे गुंतवले पाहिजेत.’

‘हो, म्हणूनच मग तशाही योजना उपलब्ध आहेत. त्यात पुन्हा मग प्रकार आहेत. जसं समज मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवावे का मध्यम किंवा छोट्या? त्यावरूनही वेगवेगळ्या योजना असतात. आता तर अगदी पिटुकल्या आकाराच्या कंपन्यात गुंतवायच्या पण योजना आहेत.

आणि या सर्वांचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी आपण चांगल्या अर्थसल्लागाराचे योग्य ती मदत घ्यायला घाबरता नये. म्युचुअल फंडातील कोणतीही गुंतवणूक ही पूर्णतः पारदर्शी असते फक्त वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला सल्लागाराकडूनच समजून घेऊन गुंतवणुकीसंबधी निर्णय घेणे आवश्यक असते.

 

 

 

This Post Has 2 Comments

  1. Nana

    Very good convincing.

    1. Pradeep Joshi

      thanks nanasaheb!!

अभिप्राय द्या!