गेले चार महिने धनलाभचे संकेतस्थळ स्थापन झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी गुंतवणुकीबाबत चौकशी केली त्यातून काही सर्वसामान्य प्रश्न समोर आले त्यांची उकल थोडक्यात वाचा-

१) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही जाणकारांनीच करावी.

  • प्रत्यक्षात म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही सामान्य लोकांसाठीच असते. ज्यांना शेअर बाजार व त्यातील गुंतवणूकीबद्दल काहीही माहित नसते तेही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडाचा फंड व्यवस्थापक हा या क्षेत्रातील तज्ञ असतो व गुंतवणूकदारांचे हित पाहणे हेच त्याचे काम असते, त्यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान करणे हे त्याच्याही मनीही  नसते.

२) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही दीर्घकालीनच असावी.

  • गुंतवणूकदाराने आपले आर्थिक ध्येय ठरवून गुंतवणूक केली तर या गुंतवणुकीपासून उद्दिष्ट गाठणे सहज शक्य असते. उद्दिष्टे ठरविताना कमी कालावधीची उद्दिष्टे व दूरच्या कालावधीची उद्दिष्टे अशी विभागणी करून गुंतवणूक केल्यास उद्दिष्ट प्राप्ती सहज साध्य होते.

३) म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक व शेअर मार्केटमधील गुंतवणूक यामध्ये काहीही फरक नाही.

  • फंड व्यवस्थापकाकडे जमा झालेल्या फंडाचे योग्य व्यवस्थापन करणे ही त्याची जबाबदारी असते. या एकत्रित फंडापैकी किती रक्कम कोणत्या प्रकारच्या इक्विटी फंडात गुंतवावी तसेच उरलेली रक्कम कोणत्या प्रकारच्या DEBT व Arbitrage फंडात करावी याबाबत फंड हाउसने सक्त   सूचना फंड मॅनेजरला दिलेल्या असतात त्यानुसारच गुंतवणूक करणे ही त्याची जबाबदारी असते. शेअर बाजारात रोखे गुंतवणूक शक्य नसल्याने एखादा शेअर खूप खाली जाऊन नुकसान होवू शकते, पण म्युच्युअल फंडामध्ये रोखे गुंतवणूक शक्य असल्याने बाजार खाली जात असला तरी नुकसान किमान पातळीवर ठेवता येते.

४) फंडाच्या NAV नुसार फंडाची निवड करणे संयुक्तिक असते की नसते?

  • ज्या फंडाची NAV रु. १०/- ने सुरुवात होते त्या फंडांना सर्वसाधारणतः NFO म्हणून संबोधले जाते. एखादा फंड ज्याची NAV रु. २५/- असताना आपण गुंतवणूक करायची ठरविल्यास व हे दोन्ही फंड एकाच प्रकारच्या  सेक्टरचे फंड असल्यास या दोन्ही मधील वाढ सर्वसाधारणपणे एकसारखी असू शकते, त्यामुळे फंडाची NAV रु. १०/- असो किंवा रु. ५०/- असो आपल्याला होणारा फायदा हा समान रकमेचा असू शकतो. त्यामुळे फंडाची NAV कितीही असो त्या फायद्यावर NAV नुसार बंधने असू शकत नाही.

५) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भरपूर रक्कम आवश्यक असते.

  • हा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये आपण रु. ५००/- पासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. फक्त Lump sum गुंतवणूक ही सामान्यतः     रु. ५०००/- पासून सुरु होवून रु. १००/- च्या पटीत करता येते.

६) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना DEMAT अकाऊंट असणे आवश्यक आहे.

  • म्युच्युअल फंडमधील युनिट्स आपण Physical स्वरूपामध्ये घेऊ शकतो त्यासाठी DEMAT अकाऊंट असणे बंधनकारक नाही.

७) उच्च मूल्याच्या व उच्च धारणाशक्ती असणारा फंड घेणे केव्हाही फायद्याचे.

  • म्युच्युअल फंडच्या बाबतीत NAV व एकूण नक्त मालमत्ता व फंडाचा एकूण कालावधी यावर त्या फंडाचा परतावा कशा प्रकारे दिला गेला आहे हे कायम स्वरूपी सांगितले जाते. चांगला परतावा देणारा फंड कायम चांगलाच परतावा देईल असे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयानुसार चांगला फंड निवडून त्यातली गुंतवणूक आपल्या ध्येयानुसार परतावा देईल याची खात्री सल्लागाराकडून करून मगच गुंतवणूक करणे योग्य.

अभिप्राय द्या!