२०१७ या वर्षात म्युच्युअल फंड व्यवसायातील एकूण मालमत्तेने एकोणीस लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. म्युच्युअल फंडांची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. २००७ या वर्षात साधारणतः तीन लाख कोटी रुपये एवढी एकूण मालमत्ता असलेला हा व्यवसाय अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत पाचपट वाढला, यातूनच त्याची वाढती लोकप्रियता लक्षात येते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2016 या वर्षात म्युच्युअल फंडातील एकूण खात्यांची संख्या पाच कोटींपेक्षा अधिक झाली आहे. यापैकी जवळजवळ चार कोटी खाती ही इक्विटी फंड आणि संबंधित फंडामध्ये आहेत. याशिवाय सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पर्यायामध्येदेखील एकूण खात्यांची संख्या याच वर्षात एक कोटीच्या पुढे पोचली. आपल्या देशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेता अजूनही बहुसंख्य छोटे गुंतवणूकदार या गुंतवणूक पर्यायापासून दूर आहेत, हेदेखील सत्य आहे. २०१७च्या उर्वरित वर्षात अशा गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक पर्यायाचा विचार करायला हवा असे वाटते. तसेच क्रिकेटच्या खेळात ज्याप्रमाणे कसलेला फलंदाजदेखील ठराविक वेळानंतर क्षेत्ररक्षणाचा अंदाज  घेतो आणि फलंदाजीस तयार होतो, त्याचप्रमाणे जुन्या गुंतवणूकदारांनीसुद्धा आपल्या आतापर्यंतच्या गुंतवणुकीचा अंदाज घेऊन  या वर्षातील गुंतवणुकीचे नियोजन करावे. त्या दृष्टीने पुढील मुद्दे नव्या; तसेच जुन्या गुंतवणूकदारांसाठी उपयोगी पडतील, असे वाटते- 1) “एसआयपी’ पाच वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्याचा निश्‍चय करणे, 2) परिपूर्ण गुंतवणुकीसाठी डायव्हर्सिफाइड, लार्जकॅप, मिडकॅप, सेक्‍टोरल, बॅलन्स्ड आणि गोल्ड फंड पाच-सहा फंड निवडणे, 3) शेअर बाजारातील गुंतवणूक आणि करबचत हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी टॅक्‍स सेव्हिंग्ज फंडाचा अवश्‍य विचार करावा.
जून २०१७ पर्यंतच्या पाच वर्षांत आपापल्या विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या काही फंडांची नावे पुढीलप्रमाणे- युटीआय ट्रान्स्पोर्टेशन अँड लॉजिस्टिक्‍स फंड, डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप फंड, एसबीआय ब्लू चीप फंड, रिलायन्स टॉप 200 फंड, बिर्ला सनलाईफ टॉप 100 फंड, ऍक्‍सिस लॉंग टर्म इक्विटी फंड, प्रिन्सिपल टॅक्‍स सेव्हर फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बॅलन्स्ड फंड, एचडीएफसी बॅलन्स्ड फंड, टाटा बॅलन्स्ड फंड.

गुंतवणुकीपूर्वी मात्र आपल्या सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा !!

अभिप्राय द्या!