शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-“निफ्टी’ बहुचर्चित 10 हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात “करेक्‍शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत करणे हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे “करेक्‍शन’ लगेच सुरू होण्याची शक्‍यता दिसत नाही. “करेक्‍शन’ येण्याची पूर्वसूचना देणारी परिमाणे तसे संकेत दर्शवत नाहीत. परकी व देशी वित्तीय संस्थांचा बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. एप्रिल ते जून महिन्यात परकी गुंतवणूकदारांनी विक्री केली असतानाही, देशी गुंतवणुकीच्या आधारे “निफ्टी’ 5.5 टक्के वाढला. सध्या दोघेही खरेदी करीत आहेत. या खरेदीमागे, पुढील महिन्यात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता, संपूर्ण देशात अपेक्षेप्रमाणे पडत असलेला पाऊस, वस्तू व सेवाकराची संपूर्ण देशात अंमलबजावणी व त्यामुळे देशाच्या महसुलात होणारी वाढ, जून तिमाहीचे कंपन्यांचे निकाल चांगले असतील, या बाबी गृहीत आहे. जून तिमाहीतील आतापर्यंत जाहीर झालेले निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. सध्याच्या परिस्थितीत 9750 अंशांपर्यंत “करेक्‍शन’ झाल्यास, परत तेथून “निफ्टी’ 10,250 अंशांच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता आहे. भारत-चीन सीमेवरील तणावात वाढ झाल्यास बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची भीतीही आहे. हा तणाव युद्धात परावर्तीत होणार नाही, असे बाजार मानून चालत आहे. परंतु, या बाजूने सावध असणे उचित राहील.

अभिप्राय द्या!