श्रावण महिन्यात अनेकजण  व्रत वैकल्ये  करतात .या संकेतस्थळावर शुक्रवारच्या कहाणीच्या रूपाने संपत्ती निर्मिती  सम्बंधात कहाणी सांगण्याचे ठरवले आहे. आजची कहाणी ही SWP संबंधात असलेले गैरसमज दूर करण्याच्या निमित्ताने सांगितली  जात आहे .

निवृत्तीपश्चात बहुतांश मंडळी बँकेच्या मुदत ठेवींवर अवलंबून असतात. दरमहा वेतनाद्वारे मिळणारे नियमित उत्पन्न थांबल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आपल्या या बचतीवरील परतावा हाच या मंडळींचा आधार असतो. या पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा नियमित परतावा मिळविण्याचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील एसडब्ल्यूपी अर्थात ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ हा एक चांगला मार्ग आहे. ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ याचा ढोबळ अर्थ – आपल्या बचतीतून नियमितपणे खर्चाला आवश्यक इतकी रक्कम काढून घेणे हाच आहे.

सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) ही अशी सुविधा आहे जी एखाद्या गुंतवणूकदारास निर्धारित कालांतराने अस्तित्वात असलेल्या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याची परवानगी देते. अशा तऱ्हेने पद्धतशीर काढून घेतलेल्या पैशाची दुसऱ्या फंडात पुनर्गुतवणूक केली जाऊ  शकते किंवा या रकमेचा गुंतवणूकदाराकडून वर म्हटल्याप्रमाणे उदरनिर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

समभाग गुंतवणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारी नफ्याची रक्कम ही करमुक्त असते.त्यामुळे गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षाने SWP करणे हितावह आहे.

एसडब्ल्यूपी व एमआयपीमध्ये   काय  चांगले ?

एमआयपीच्या तुलनेत ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लान’ हा पर्याय अनेकांगाने सरस आहे सर्वप्रथम दोहोंमध्ये तुलना न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, ‘एमआयपी’ ही गुंतवणुकीची एक योजना आहे, तर एसडब्ल्यूपी ही म्युच्युअल फंडांची कोणती योजना नव्हे, तर अस्तित्वात असलेल्या कोणत्याही योजनेतील गुंतवणूकदाराला उपलब्ध करून दिली गेलेली ती एक नियमित प्राप्तीची सुविधा आहे. एकदा एसडब्ल्यूपीसाठी गुंतवणूकदाराने अर्ज केला त्याला त्याच्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणुकीतून ठरलेल्या तारखेला अपेक्षिलेला लाभ मिळत जाईल

एसडब्ल्यूपी कोणासाठी?
  • जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत अथवा लवकरच ज्यांना नियमित वेतन मिळणे बंद होईल, त्यांना सेवानिवृत्तीनंतरही मासिक पगारांप्रमाणेच उत्पन्न प्रवाह नियमित राखण्यासाठी आपल्या निवृत्ती लाभ पुंजीचा वापर अशा पद्धतीने करता येईल.
  •  घरापासून दूर शिक्षणासाठी गेलेल्या, आपल्या मुलांना दर महिन्याला खात्रीशीर शिक्षण शुल्क, पॉकेट मनी प्रदान करण्यासाठी गुंतवणूकदार या पद्धतीचा वापर करू शकतात.
  • म्युच्युअल फंडाच्या एका योजनेतून काढून घेतलेल्या पैशाची पद्धतशीरपणे दुसऱ्या फंडात पुनर्गुतवणूक करण्यासाठी.

ही साठा उत्तराची कहाणी पाचामुखी संपन्नता आणो हीच सदिच्छा !!!

 

अभिप्राय द्या!