गेल्या तीन वर्षांत सरकारने अनेक सुधारणांवर अंमल सुरू केला आहे. ‘जॅम’ (जनधन, आधार, मोबाईल यांचे संक्षिप्त रूप) त्रिसूत्री, थेट अनुदान हस्तांतरण, वित्तीय शिस्त,  आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रांचे दरवाजे खुले करणे ही त्यापैकी काही उल्लेखनीय पावले होत. पुढे जाऊन वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी आणि २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही धोरणे महत्त्वाचा कायापालट घडवून आणतील. इतर काही कठीण सुधारणांचा मार्गही खुला होण्याची प्रतीक्षा आहे,  बँकिंग क्षेत्राला एनपीए समस्येतून निर्णायक मोकळीक आणि काळा पैशाच्या समांतर व्यवस्थेचा पायबंदही सरकारकडून होईल अशी आशाआहे !!

भारतीय रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य ६० ते ६९ या आखूड टप्प्यात  आहे. या अत्यंत जोखीमयुक्त कालावधीत रुपयातील ही स्थिरता खूपच कौतुकास्पद आहे. समाधानकारक पातळीवर राहिलेला चलनवाढीचा दर, कमी  पातळीवर आलेली चालू खात्यावरील तूट आणि फुगलेली परकीय चलन गंगाजळी हे यामागील महत्त्वाचे घटक राहिले आहेत.

सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाने वित्तीय वर्ष २०१६ मधील ११ टक्क्य़ांऐवजी २०१७ मध्ये २४ टक्के अधिक खर्च केला आहे. अन्नधान्य उत्पादन आणि हमी भावात वाढीचा दर गेल्या तीन वर्षांत आधीच्या वर्षांंच्या तुलनेत सर्वाधिक आहे.  पीक विमा योजना, मातीची आरोग्य तपासणी इत्यादींनी शेतकऱ्यांचीही मान्यता  आहे. व याचा  ग्रामीण समुदायाला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला लाभ मिळेल.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या तुलनेत व्याजदर कपातीबाबत वाणिज्य बँका जरी काहीशा पिछाडीवर राहिल्या असल्या तरी गेल्या दोन वर्षांंपासून  बँकांनी आधार दर (बेस रेट) / एमसीएलआर दर तब्बल १.८५ टक्कय़ांनी कमी केले आहेत. भारतीय कॉर्पोरेट जगत आणि एकूण ग्राहक वर्गाला आर्थिक वर्ष २०१८ हे संपूर्ण वर्ष कर्ज स्वस्ताईच्या उपभोगाची संधी देणारे असेल.

सारांश वरील घटक हे अर्थव्यवस्था आणि बाजाराचा कल आणि संभाव्य परताव्याचा संकेत देणारे ठळक निर्देशांक आहेत. जागतिक स्तरावर धुरकटलेले अर्थचित्र तब्बल दशकभरानंतर निवळत चालले आहे; भारताची वृद्धी क्षमता ही आर्थिक सुधारणांची कास धरल्याने खूप उंचावली आहे. किंबहुना उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि बाजाराचीही कामगिरी सर्वात चमकदार राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही चढ-उतार आणि अस्थिरतेतून न डगमगता जो या कालावधीत बाजारात गुंतवणूक कायम ठेवेल तो गुंतवणूकदार नक्कीच फायद्यात असेल. व हे सर्व  फायदे घेण्यासाठी म्युच्युअल फंडच सर्व श्रेष्ठ पर्याय होऊ शकतो हे निश्चित !!

अभिप्राय द्या!