SIP संबंधात अनेकांनी विचारणा केली असल्याने त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी देणेत येत आहे .
नियमित कालावधीनंतर (सामान्यतः दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे एसआयपी होय. आधी ठरवल्यानुसार, एसआयपी पद्धतीने गुंतवणूकदार युनिट्स विकत घेतात. एसआयपीमुळे गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळते, बाजारात उतरण्याची वेळ साधता येते तसेच त्यांच्या गुंतवणुकीला शिस्त लावण्याचीही संधी मिळते.
खुल्या म्युच्युअल फंडासाठी केव्हाही एसआयपी सुरू करता येते. एसआयपीसाठी एक अर्ज भरून तो म्युच्युअल फंडाच्या केंद्रावर द्यावा लागतो. एसआयपीचा अर्ज भरल्यापासून एसआयपी सुरू होईपर्यंत १० ते ३० दिवसांचा कालावधी जातो. या काळात बँक तुमची एसआयपी रजिस्टर करते व सुरू करते.
किती काळासाठी एसआयपी ठेवता येते?
अनेक म्युच्युअल फंडांतून किमान सहा महिने एसआयपी सुरू ठेवावी लागते. गुंतवणूकदारांना एसआयपीसाठी कालावधी निवडण्याची मुभा असते. याखेरीज गुंतवणूकदाराला, त्याने म्युच्युअल फंडाला पुढील सूचना देईपर्यंत एसआयपी सुरू ठेवण्याचाही पर्याय असतो. प्रत्येक एसआयपी गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला जोडून घ्यावी, असा सल्ला वित्त नियोजक गुंतवणूकदारांना नेहमी देतात, जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती एसआयपी सुरू ठेवता येईल.
एसआयपीची रक्कम बदलता येते का?
गुंतवणूकदाराला त्याच्या एसआयपीची रक्कम कमी करता येते किंवा वाढवता येते. मात्र यासाठी पहिली एसआयपी रद्द करून नवी एसआयपी सुरू करावी लागते. यासाठी म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जात नाही.
SIP सुरु असताना त्यामध्ये एक गठ्ठा रक्कम सुद्धा गुंतवता येते .